आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे शहरात महापालिकेकडून कचरा खरेदी कोटीच्या घरात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- शहरातील कचर्‍याचे संकलन करण्यासाठी महापालिकेने ठेकेदार नियुक्त केला आहे. या ठेकेदाराने गेल्या तीन महिन्यांत सुमारे 17 हजार 208 टन कचरा संकलित केला आहे. हा कचरा महापालिकेने एक कोटी आठ लाख 37 हजार रुपये खर्च करून ठेकेदाराकडून विकत घेतला आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागात स्वच्छता कर्मचार्‍यांची कमतरता असल्याने अनेक भागात दररोज स्वच्छता होत नव्हती. त्यामुळे विविध भागातील वसाहतींमध्ये सर्वत्र मोठय़ा प्रमाणावर कचरा विखुरलेला दिसून येत होता. त्यातून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. हा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनातर्फे कचरा संकलनासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार जून महिन्यात ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. ठेकेदारातर्फे कचरा संकलनासाठी 50 वाहनांचा वापर केला जात असून, सुमारे शंभर ते सव्वाशे कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठेकेदाराकडून महापालिका प्रशासन 780 रुपये प्रति टन दराने कचरा विकत घेत आहे. ठेकेदाराचे कर्मचारी शहरात पहाटेपासून कचरा संकलनाचे काम करतात. संकलित केलेला कचरा महापालिकेच्या गांडूळ खत प्रकल्पात जमा करण्यात येतो. त्यानंतर तेथे कचर्‍याची मोजणी केली जाते. सद्यस्थितीत रोज सुमारे दीडशे टन कचरा संकलित होत आहे. ठेकेदाराने जून महिन्यात पाच हजार 171 टन कचरा जमा केला होता. त्यातून 54 हजारांचा 69 टन कचरा कपात करण्यात येऊन त्याला एक हजाराचा दंड करण्यात आला. जुलै महिन्यात संकलित झालेल्या पाच हजार 437 पैकी 100 टन कचरा कपात करण्यात येऊन 45 हजारांचा दंड करण्यात आला. ऑगस्ट महिन्यात संकलित झालेल्या सहा हजार 200 पैकी 162 टन कचरा कपात करण्यात आला. चालू महिन्यात ठेकेदाराला पाच हजारांचा दंड करण्यात आला आहे. कामात हलगर्जीपणा केल्याने ठेकेदाराकडून तीन महिन्यांत महापालिकेने 51 हजारांचा दंड वसूल केला आहे.

अशी झाली कचरा खरेदी

महापालिकेने ठेकेदाराला जून महिन्यात कचर्‍याच्या खरेदीपोटी 43 लाख 87 हजार 926 रुपये, जुलैत 37 लाख 78 हजार 441 रुपये तर ऑगस्ट महिन्यात 26 लाख 70 हजार 848 रुपये दिले असल्याची माहिती महापालिकेच्या लेखा विभागातर्फे देण्यात आली. दरम्यान, कचरा संकलनासाठी ठेकेदाराने कर्मचारी वाढविण्याची गरज व्यक्त होत आहे.

वाहने दिली भाड्याने

महापालिकेने ठेकेदाराला कचरा संकलनासाठी काही वाहने भाडेतत्त्वावर दिली आहेत. त्यापोटी ठेकेदाराकडून दरमहा तीन लाख 26 हजार रुपये भाडे आकारले जात आहे. दरम्यान, ठेकेदारातर्फे शहरातील विविध भागात घंटागाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे अद्यापही अनेक भागात घंटागाड्या जात नसल्याची स्थिती आहे.