आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाकाऊ फ्लाय अॅशपासून वॉशिंग केक, क्रॉकरी प्रॉडक्टचा प्रस्ताव, शहरातील युवा उद्योजकाचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - महानिर्मितीच्या नवीन फ्लाय अॅश धोरणातून वीज निर्मितीनंतर टाकाऊ राखेचा वापर वाढणार आहे. राखेपासून आता बांधकामाच्या विटांसह वॉशिंग केक (साबण), वॉशिंग पावडर, डिश वॉशिंग क्रिम, ड्राय सिमेंट, वीज खांबांवर वापरल्या जाणाऱ्या डिस्क इन्सुलेटरची निर्मिती करण्याचा प्रस्ताव शहरातील युवा उद्योजक अनिरुद्ध ओक यांनी महागॅम्सला दिला आहे. यामुळे शहरात रोजगार निर्मिती होणार आहे.
राज्यातील ऊर्जा विभागाने फ्लाय अॅश धोरण जाहीर केले आहे. यापूर्वी महानिर्मितीच्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून टाकाऊ फ्लाय अॅशचे उत्सर्जन केले जात होते. या राखेचा परिपूर्ण वापर होत नसल्याने परिसरात मोठ्याप्रमाणात प्रदूषण निर्माण होते. या प्रदूषणावर आळा बसावा, तसेच राखेचा १०० टक्के वापर व्हावा, यासाठी ऊर्जा विभागाने राज्यात फ्लाय अॅश धोरण राबवले आहे. या माध्यमातून महानिर्मितीसोबत संलग्न ‘महागॅम्स’ कंपनीची निर्मिती करण्यात आली आहे. महागॅम्सने नागपूर येथील प्रादेशिक कार्यालयात नुकतेच राखेच्या वापरासंदर्भात कार्यशाळा घेतली होती. यात शहरातील युवा उद्योजक अनिरुद्ध ओक यांच्या मे. मालती इंडस्ट्रीज या कंपनीनेही रोजगार निर्मितीसाठी सकारात्मकता दर्शवली आहे. ओक सध्या भुसावळातील एमआयडीसीमध्ये फ्लाय अॅशपासून बांधकामासाठी उपयुक्त विटांची निर्मिती करतात. महागॅम्सने दीपनगरातील नियोजित क्लस्टरमध्ये जागा, पाणी, वीज उपलब्ध करून दिल्यास त्यांनी फ्लाय अॅशपासून वॉशिंग केक, वॉशिंग पावडर, डिश वॉशिंग क्रिम, ड्राय सिमेंट, वीज खांबांवर वापरल्या जाणाऱ्या डिस्क इन्सुलेटरची निर्मिती करण्याबाबतचा प्रस्ताव महागॅम्सला दिला आहे. भविष्यात दीपनगरात निर्माण होणाऱ्या क्लस्टरमध्ये अनेक उद्योगांना संधी मिळेल.

-दीपनगर औष्णिकवीजनिर्मिती केंद्रामधून निघणाऱ्या राखेचा उपयोग करून अनेक प्रकारच्या वस्तूंची निर्मिती करता येऊ शकते. याबाबत आपण प्रस्ताव दिला असून आगामी काळात या क्लस्टरच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी देण्याचा प्रयत्न आहे. फ्लाय अॅश हा सिरॅमिकलाही उत्तम पर्याय म्हणून समोर आल्याने उद्योजकांसाठी संधी आहे.
-अनिरुध्द ओक,युवा उद्योजक, भुसावळ

वीट उद्योगाला अधिक संधी
फ्लायअॅशपासून तयार होणाऱ्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होणेही आवश्यक आहे. अॅशपासून वस्तूंची निर्मिती होईल, मात्र या वस्तूंना बाजारपेठ मिळणे आवश्यक आहे. महानिर्मितीने राबवलेल्या धोरणात ३०० किमी क्षेत्रात शासकीय बांधकामांसाठी फ्लाय अॅशपासून निर्मित विटा वापरण्याचे बंधन आहे. त्यामुळे सर्वाधिक निर्मिती विटांची होणार असल्याचे संकेत आहेत.
बातम्या आणखी आहेत...