आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिक दराने दूधविक्री करणारे रडारवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सीलबंद प्लास्टिक पिशवीत दुधाची विक्री करताना एमआरपी (कमाल विक्री किंमत)पेक्षा अधिक दराने विक्री करणार्‍यांवर मुंबईत कारवाई केली जात आहे. जळगाव शहरातही काही विक्रेत्यांकडून सीलबंद प्लास्टिक पिशवीत दुधाची एमआरपीपेक्षा जादा दराने विक्री केली जातेय. कुलिंगच्या नावाखाली ग्राहकांची लूट करणार्‍यांची अचानक तपासणी करण्याच्या हालचाली वैधमापन विभागाने सुरू केल्या आहेत.

शहरात दररोज सीलबंद प्लास्टिक पिशवीतील सुमारे ५५ ते ६५ हजार लिटर दुधाची मागणी आहे. उत्पादकांमार्फत गायीचे, म्हशीचे, गोल्ड अशा विविध प्रकारांत गुणवत्तेनुसार स्थानिक, शहराबाहेर आणि जिल्ह्याबाहेर जाणार्‍या दुधाच्या किमती निश्चित करण्यात येतात. मात्र, छापील दराव्यतिरिक्त कुलिंग चार्जेसच्या नावाखाली शहरातील काही विक्रेत्यांकडून जादा दराने दूधविक्री केली जात आहे. ग्राहकांचे अज्ञान आणि वैधमापन विभागाच्या दुर्लक्षामुळे ग्राहकांची लूट सुरू आहे. मुंबईत अशा प्रकारे जादा दराने दूधविक्री करणार्‍यांवर कारवाई केली जात असताना जळगावच्या वैधमापन विभागानेदेखील ग्राहकांची लूट करणार्‍यांची तपासणी सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबतच्या तक्रारीसाठी ग्राहकांनी (०२५७) २२४११४९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.

अचानक तपासणी करणार
कुलिंग चार्जेसच्या नावाने एमआरपीपेक्षा जास्त दराने सिलबंद पाणी, दूध विक्री करुन ग्राहकांची लूट करणार्‍यांची अचानक तपासणी करण्यात येईल. यात दोषी आढळल्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल. एखाद्या ग्राहकान तक्रार केल्यास तपासणी करण्यात येईल. - एस.व्ही. अभंगे, सहायक नियंत्रक, वैधमापन विभाग

तक्रार आल्यास एजन्सी रद्द
शहरात शहराबाहेर वितरणासाठी होणारा खर्च लक्षात घेऊन दुधाच्या कमाल विक्री किंमत टाकून दिलेली आहे. मात्र, या पेक्षा अधिक दराने दुधाची विक्री करणे अपेक्षित नाही. तसे होत असल्यास पिशवीवरील ‘कस्टमर केअर’ क्रमांकावर फोन लावून ग्राहक आमच्यापर्यंत तक्रार करु शकतो. तक्रारीत तथ्य आढळून आल्यास संघ संबंधिताची एजन्सी रद्द करू शकते. मनोज लिमये, व्यवस्थापक जिल्हा दूध संघ