आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वे प्रशासन करणार 10 टक्के पाणी कपात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - पाऊस लांबणीवर पडल्याने आशाळभूत नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. आठवडाभरात दमदार पावसाचे आगमन झाले नाही तर रेल्वे प्रशासन यंदा जुलैपासून 10 टक्के पाण्याची कपात करणार आहे. त्यानुषंगाने धोरणात्मक निर्णय घेण्याची तयारी सुरू आहे.
भुसावळात रेल्वे वसाहतींसह अधिकारी, कर्मचारी कार्यालय व रेल्वेस्थानकावर दिवसभरातून दोनवेळा मुबलक पाणीपुरवठा केला जातो. हतनूर धरणाच्या पाण्याचे रेल्वे प्रशासनाने आरक्षण केलेले आहे. मात्र, पाऊस जास्तच लांबला तर टंचाईचे संकट येऊ नये म्हणून आतापासूनच खबरदारी घेतली जात आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या सूचना सर्व कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी केली जात आहे. भुसावळात रेल्वे कर्मचारी व अधिकार्‍यांची निवासस्थाने हे सर्व मिळून जवळपास 4 हजार 500 नळ कनेक्शन आहेत. रेल्वे यार्डात पॅसेजर गाड्यांची स्वच्छता करणे व स्थानकांवरील गाड्यांमध्ये पाणी भरणे यासाठी दररोज रेल्वे प्रशासनाला 1 कोटी 30 लाख लिटर पाणी लागते. तापी नदीवरील बंधार्‍या तून पाण्याची उचल केली जाते. तीन आठवड्यानंतर एकदा हतनूरचे आवर्तन मागितले जाते. रेल्वेगाड्या धुण्यासाठी दररोज येथे 50 लाख लिटर पाणी लागते. त्यातही आता पुढील आठवड्यापासून कपात होण्याची शक्यता आहे.
रेल्वेस्थानकावर 400 नळ
प्रवाशांना 24 तास पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी 400 नळ रेल्वेस्थानकावर विविध ठिकाणी बसवण्यात आले आहेत. पाण्याचा अपव्यय होऊ नये म्हणून प्रवाशांनी पाणी पिल्यानंतर नळ बंद करावा, अशा सूचना वेळोवेळी केल्या जात आहेत.

गाड्या धुण्यासाठी स्वच्छ पाणी
भुसावळ रेल्वे यार्डात गाड्या धुण्यासाठी जवळपास 50 लाख लिटर पाणी लागते. प्रवासी गाड्यांच्या शौचालयांमध्ये वापरासाठी बसवलेल्या एका टाकीत 1 हजार 100 लिटर पाणी लागते. एका गाडीत साधारणपणे अशा 24 टाक्या असतात. अधिकारी व कर्मचारी निवासस्थाने व कार्यालयांसाठीदररोज 80 लाख लिटर पाणी पुरवले जाते.
अधिकार्‍यांशी चर्चा करून निर्णय शक्य
पावसाळा लांबण्याची चिन्हे असल्याने रेल्वे प्रशासन दक्ष झाले आहे. संभाव्य टंचाई टाळण्यासाठी 1 जुलैपासून 10 टक्के पाणी कपातीची अंमलबजावणी कशी करता येईल? यानुषंगाने प्रयत्न केले जात आहेत. हतनूर धरणाचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी यांची संयुक्त बैठक येत्या आठवडाभरात होण्याचे संकेत रेल्वे प्रशासनाने दिले आहेत.

बचतीच्या सूचना
४संभाव्य पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी जुलै महिन्यात 10 टक्के पाणी कपात करण्याचे प्रयत्न आहेत. पहिल्या आठवड्यात अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी विविध विभागात पाणीबचतीचा संदेश दिला जात आहे.
राजेंद्र देशपांडे, वरिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग, रेल्वे विभाग