आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हतनूरमधून प्रकल्पांना मिळू शकते पाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - गेल्या वर्षी 3 जूनला हतनूर धरणात पाण्याची आवक वाढली होती. 10 जूनच्या आसपास पेरण्या पूर्ण होऊन जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकस्थिती उत्तम होती. यंदा मात्र पाऊस नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हतनूर धरणावर जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या निर्देशानुसार 31 जुलैपर्यंत आरक्षण आहे. हतनूर धरणाची स्थिती समाधानकारक असल्याने आरक्षणानुसार पाणीपुरवठ्यात अडचणी येणार नाहीत. उलट आरक्षणानुसार वितरण करूनही पाणी शिल्लक राहणार आहे. असे असले तरी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार अंमलबजावणी होणार आहे. 1 जुलैपासून केवळ पिण्यासह औद्योगिक वापरासाठी पाणीपुरवठा होईल. कृषी वापरासाठी उन्हाळी सिंचन हंगाम 30 जूनअखेर बंद होणार असल्याने कॅनॉलमधून आवर्तन सोडणे बंद करण्यात येणार आहे. यासंदर्भात सध्या पाटबंधारे विभागाकडून नियोजन सुरू आहे. जुलैअखेरपर्यंत पाऊस लांबला तरी हतनूर धरणातून पाणीपुरवठा होणार्‍या गावांना आवर्तन सोडता येणार आहे. यासह जिल्हाधिकार्‍यांनी निर्देश दिल्यास प्रकल्पांना पाणीपुरवठा करणे शक्य होईल.
हतनूरवर अवलंबून प्रकल्प, शहर व गावे
औद्योगिक वापर, सिंचन : जिल्ह्याची जलसंजीवनी असलेल्या हतनूर धरणातून भुसावळ औष्णिक वीजनिर्मिती केंद्र, मध्य रेल्वे प्रशासन भुसावळ, आयुध निर्माणी वरणगाव, आयुध निर्माणी भुसावळ, आरपीडी डेपो भुसावळ, जळगाव आणि मलकापूर एमआयडीसीला पाणी मिळते.

स्थानिक स्वराज्य संस्था : सावदा नगरपरिषद, भुसावळ नगरपरिषद, जळगाव महानगरपालिका, रावेर नगरपरिषद, यावल नगरपरिषद, धरणगाव नगरपरिषद, अमळनेर नगरपरिषद, मलकापूर नगरपरिषद

ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणा : भुसावळ आणि मुक्ताईनगर तालुक्यातील 81 गावे पाणीपुरवठा योजना, बोदवड-तळवेल गट पाणीपुरवठा योजना, मलकापूर तालुक्यातील 22 गावांची पाणीपुरवठा योजना, मलकापूर, बोदवड आणि मुक्ताईनगरातील स्वतंत्र 15 गावांच्या पाणीपुरवठा योजना
मध्य प्रदेशावर भिस्त
हतनूर धरणाची उभारणी तापी नदीवर 1981 मध्ये झाली. तापीची उपनदी पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रातूनही धरणात पाण्याची आवक होते. तापीचा उगम मध्य प्रदेशातील मुलताई (जि.बैतूल) येथे होतो. यामुळे मध्य प्रदेशातील पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास हतनूरमध्ये पाणीसाठा वाढतो. यासह विदर्भातील अमरावती, चिखलदरा आदी भागात पाऊस झाल्यास पूर्णा नदीतून धरणात जलस्त्रोत उपलब्ध होतो.
दुष्काळात प्रकल्प वरदान
हतनूर धरणात गेल्या वर्षी 3 जून रोजी पाण्याची आवक झाल्याने विसर्ग करण्यात आला होता. धरणात गेल्या वर्षी 28 जून रोजी 39.45 टक्के जलसाठा होता. यंदा मात्र त्या तुलनेत साठा कमी असला तरी ऐतिहासिक आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत पाऊस लांबूनही साठा 24.86 टक्क््यांपर्यंत कायम असण्याची ही 1981 नंतरची पहिलीच वेळ आहे. ऐन दुष्काळी स्थितीत हतनूर धरण अर्धा जळगाव जिल्हा आणि विदर्भातील मलकापूर तालुक्यासाठी वरदान ठरणार असल्याने त्याचे महत्त्व निर्विवाद आहे.
आदेशानुसार विनियोग
हतनूर धरणावर 15 आॅक्टोबर ते 31 जुलै दरम्यानच्या काळात जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानुसार पाण्याचे आरक्षण केलेले असते. या आरक्षणानुसार पाणीवाटप करून सुद्धा यंदा धरणामध्ये तब्बल 52.21 दशलक्ष घनमीटर साठा शिल्लक राहणार आहे. शासनाच्या पुढील आदेशानुसार त्याचा विनियोग होईल. तूर्त तरी शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. 30 जूनपासून उन्हाळी सिंचनाचे आवर्तन बंद करण्यात येणार आहे.
एस. आर. पाटील, अभियंता, हतनूर धरण