आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भविष्याचा वेध: बंधार्‍याची उंची सव्वाफुटाने वाढवणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- भुसावळ पालिकेने संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दूरगामी नियोजनावर भर दिला आहे. शहरानजीक तापीनदीवरील साठवण बंधार्‍याची उंची दीड मीटरने वाढविण्याच्या कामावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. पालिकेच्या माध्यमातून शहराला पाणीपुरवठा होणार्‍या या बंधार्‍याची उंची सध्या नऊ फूट व 600 मीटर लांब आहे. ब्रिटिश राजवटीनंतर आता प्रथमच या बंधार्‍याची उंची सव्वाफुटाने वाढणार आहे. त्यासाठी पालिकेला पाच लाखांचा निधी खर्च करावा लागणार आहे.

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने ब्रिटिशांच्या काळात तापीनदीवर साठवण बंधारा उभारला आहे. तापी नदीपात्रातील उद्भव विहीर ते पंपहाउस दरम्यान 21 इंच व्यासाची 300 मीटर लांबीची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. साठवण बंधार्‍यातील पाण्याची पातळी कमी होताच पाणीटंचाईची समस्या उभी ठाकते. मात्र, या समस्येवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी पालिकेने आता या बंधार्‍याची उंची सव्वामीटरने वाढविण्याचे काम हाती घेतले आहे. साठवण बंधार्‍याची उंची वाढविण्याचा मुद्दा गेल्या वर्षभरापासून अधिक चर्चेत होता. पालिकेने त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे लेखी परवानगीही मागितली होती. ती मिळाल्याने आता या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. बंधार्‍याची उंची वाढवल्यानंतर त्याचा फायदा पालिका व रेल्वे अशा दोन्ही पाणीपुरवठा योजनांना होणार आहे.

पालिकेच्या तापीवरील बंधार्‍यात सध्या एक दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा होतो. शहराला हे पाणी जास्तीत जास्त 22 दिवस पुरते. बंधार्‍याची उंची सव्वाफुटाने वाढल्यानंतर त्यात 0.25 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा होईल. तो शहराला जास्तीत जास्त 29 दिवस पुरेल. हतनूर धरणातून पावसाळ्य़ाच्या व्यतिरिक्त हा बंधारा भरण्यासाठी वर्षभरात सरासरी नऊ ते 10 आवर्तने हतनूर धरणातून सोडली जातात. बंधार्‍याची उंची वाढवल्यानंतर या आवर्तनाची संख्या कमी करण्यास मदत होणार आहे. तापीनदीवरील या बंधार्‍याची उंची वाढविण्याच्या कामाचा शुभारंभ गुरुवारी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या हस्ते करण्यात आला. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता ए.बी.चौधरी, कैलास चौधरी, जुबेर पठाण, साहील पठाण, शेख जाकीर शेख सरदार यांच्यासह नगरसेवकांची प्रमुख उपस्थिती होती.

सात दिवस पुरेल ऐवढा साठा वाढणार
हतनूर धरणातून तापीनदीत आवर्तन सोडल्यावर सर्वप्रथम दीपनगरच्या बंधार्‍यात ते अडविले जाते. वीजनिर्मिती केंद्रात तेथून पाणी उचलले जाते. हा बंधारा भरल्यावर आयुध निर्माणी भुसावळ आणि आरपीडीचा बंधारा आहे. त्याच्या खालील भागात रेल्वे आणि पालिकेचा संयुक्त बंधारा आहे. त्यानंतर पुन्हा नदीपात्रात पालिकेचा पुन्हा स्वतंत्र बंधारा आहे. आवर्तन सोडल्यावर सुरुवातीचे तिन्ही बंधारे भरल्यानंतर सर्वात शेवटी पालिकेचा बंधारा भरतो. हतनूरचे आवर्तन या बंधार्‍यापर्यंत पोहोचण्यासाठी उन्हाळ्य़ात तर चार दिवस लागतात. बाष्पिभवनाच्या वाढत्या प्रमाणामुळे पाण्याचा अपव्यय होतो. आता बंधार्‍याची उंची सव्वाफुटाने वाढल्यावर त्यातील पाणी भुसावळ शहराला सात दिवस अधिक पुरणार आहे. संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पालिकेने हे पाऊल उचलले आहे.