आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी पेटले: भुसावळ पालिकेवर महिलांचा हंडामोर्चा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- पाटीलमळा भागात पालिकेकडून होणारा पाणीपुरवठा गेल्या चार वर्षांपासून विस्कळीत झाला आहे. नागरिकांना आठ ते 15 दिवसांआड अपूर्ण पाणीपुरवठा होतो. यामुळे संतप्त महिलांसह नागरिकांनी बुधवारी पालिका कार्यालयावर हंडामोर्चा काढून मुख्याधिकारी अनिल जगताप यांना धारेवर धरले. नगराध्यक्ष उमेश नेमाडे आणि सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी आठ दिवसांत सुरळीत पाणीपुरवठय़ाचे आश्वासन दिले.

शहरातील पाटीलमळा या विस्तारित भागात पाण्याची समस्या आहे. तापीमुळे भुसावळ शहरात पाण्याची कमतरता नाही. मात्र, केवळ नियोजन नसल्याने अनेक भागात नागरिकांचा घसा कोरडा पडतो. चार वर्षांपासून पाटील मळ्यामध्ये पूर्ण दाबाने पाणीपुरवठा झाला नाही. आठ ते दहा दिवसांआड होणारा पाणीपुरवठा अपूर्ण असल्याने नागरिकांमध्ये पालिकेच्या कारभाराबद्दल प्रचंड रोष आहे. या प्रभागाच्या नगरसेविका तथा उपनगराध्यक्षा नूरजहॉ खान यांच्याकडे अनेकवेळा गार्‍हाणी मांडण्यात आली. मात्र, दुर्लक्ष झाल्याने बुधवारी थेट पालिका कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मुख्याधिकारी अनिल जगताप यांना धारेवर धरत संतप्त महिलांनी दररोज नियमाप्रमाणे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. मुख्याधिकार्‍यांच्या दालनात महिला-पुरुषांनी प्रवेश करून जाब विचारला. नगरसेवक युवराज लोणारी, भीमराज कोळी आदींनी जमावास शांत केले. मात्र, संतप्त महिलांनी पाणी, स्वच्छता आणि रस्ते या प्रमुख सोयी मिळत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. किमान एक दिवसाआड आणि पूर्ण दाबाने पाणीपुरवठय़ाची मागणी केली. दरम्यान, या भागाला सुरळीत पाणीपुरवठय़ाचे नियोजन सुरू असल्याचे मुख्याधिकारी जगताप यांनी सांगितले. यानंतर नगराध्यक्ष उमेश नेमाडे जमावास शांत करून प्रo्न सोडविण्यासाठी पालिकेकडून सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. मुख्याधिकारी आणि उपस्थित नगरसेवकांनी आठ दिवसांत आपणास पाणी न मिळाल्यास पालिकेचा कर भरू नका, असे आत्मविश्वासाने सांगितल्याने मोर्चकरी शांत झाले.