आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळचे 1800 क्युसेक पाणी मुरले कोठे ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- हतनूर धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सलग तीन दिवस 1800 क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला. मात्र, हे पाणी रेल्वे आणि पालिकेच्या बंधार्‍यापर्यंत पोहोचलेच नाही. बुधवारी दुपारपर्यंत वरच्या बंधार्‍याची पातळी केवळ एक मीटरने वाढली. मात्र, अजूनही त्यात 52 इंच तर खालील बंधार्‍याची पाणीपातळी 40 इंचाने कमी आहे. यामुळे हतनूरचे 1800 क्युसेक पाणी मुरले कोठे? असा प्रश्न आहे.

हतनूरमधून 1500 क्युसेक पाणी सोडले तरी भुसावळ पालिका आणि रेल्वेचा बंधारा धो-धो वाहतो. गेल्या शुक्रवारी (दि.3) हतनूर धरणातून 1800 क्युसेक पाणी सोडण्यात आले. मात्र, बंधारे पूर्णपणे भरले नाहीत. यामुळे पाटबंधारे विभागाने सोडलेले पाणी गेले कोठे? असा प्रo्न अधिकार्‍यांना पडला आहे. दुसरीकडे बंधार्‍यात अपेक्षित जलसाठा नसल्याने शहरातील सर्वच भागांमध्ये 40 टक्के पाणीकपात करण्यात आली. रेल्वे प्रशासनाने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच 40 टक्के पाणीकपात केली होती. मात्र, आवर्तन सुटल्यावरही बंधार्‍यातील पाणीपातळी न वाढल्याने पाणी कपातीमध्ये 10 टक्के वाढ होण्याची चिन्हे आहे. नदीपात्रातील बंधार्‍यांची जलपातळी कमी झाल्याने वीजपंप चालणे मुश्किल झाले आहे. पालिकेच्या 300 अश्वशक्तीचा पंप कालबाह्य झाला असून पाणीपातळी खालावल्याने जास्त दाबाने पाणी उचलावे लागते.

आरपीएफ जवानांची मदत घेणार
कंडारी ग्रामपंचायतीच्या बंधार्‍याचे गेट मंगळवारी उघडल्यानंतर पालिका-रेल्वेच्या संयुक्त बंधार्‍याची पातळी एक मीटर वाढली. मात्र, मंगळवारी रात्री अज्ञात व्यक्तीने गेट बंद केल्याने प्रवाह बंद झाला. हे प्रकार टाळण्यासाठी रेल्वे पाणीपुरवठा विभाग आरपीएफ जवानांचा बंदोबस्त लावणार आहे. रेल्वेचा बंधारा भरल्याशिवाय पालिकेच्या बंधार्‍यात पाणी पोहोचणार नसल्याने हतनूर धरणातून पुन्हा पाणी सोडण्याशिवाय पर्याय नाही.

फक्त चार दिवस मिळेल दिलासा
हतनूर धरणातून 3 ते 6 मे असे तीन दिवसात दररोज 600 क्सुसेक पाणी सुटूनही बंधार्‍यातील जलपातळी फक्त एक मीटरने वाढली आहे. त्यामुळे शहर आणि रेल्वेला फक्त चार दिवस दिलासा मिळेल. मात्र, यानंतर पुन्हा आवर्तन न सुटल्यास पाणीटंचाई निर्माण होणे निश्चित आहे. ही टंचाई टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी करण्यात आली आहे.

बंधार्‍यात पाणी आलेच नाही
दुष्काळी स्थितीमुळे रेल्वेने यापूर्वीच पाणीकपात केली होती. आता तर आवर्तन सुटूनही बंधार्‍यात पाणी आलेले नाही. यामुळे वर फुटबॉल असलेला पंप क्रमांक एक बंद करावा लागला. याचा फारसा परिणाम होणार नसला तरी केवळ तीन ते चार दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे.
-राजेंद्र देशपांडे, अभियंता, मध्य रेल्वे पाणीपुरवठा विभाग

पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष
पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे शहरावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. 1800 क्युसेक पाणी सोडल्यास ते बंधार्‍यातून ओसंडून वाहते. मात्र, या वेळी पाणी कमी मिळाले. बंधारा पूर्ण भरला तर 28 दिवस पुरेल इतका जलसाठा कायम राहतो.
-अनिल बी. चौधरी, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग

आवर्तनासाठी फॅक्स पाठवला
पाटबंधारे विभागाने सोडलेले पाणी कोणी पळवले? याचा शोध घेणे आवश्यक आहे. जिल्हाधिकार्‍यांना भेटून माहिती देणार आहोत. या प्रकारामुळे शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाटबंधारे विभागाला आवर्तनासाठी फॅक्स पाठवला आहे. टंचाई निर्माण होणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- उमेश नेमाडे, नगराध्यक्ष, भुसावळ नगरपालिका

पुन्हा आवर्तन सोडण्याची तयारी
पाण्यासाठी कोणालाही वेठीस धरणार नाही. पालिकेच्या मागणीप्रमाणे 1800 क्युसेक पाणी सोडले. मात्र, ते पोहोचले नसल्याचे समजले. हे पाणी कोठे मुरले? याचा शोध घेवू. पालिका-रेल्वेकडून पुन्हा आवर्तन सोडण्याचा निर्णय होईल.
-ए. एस.मोरे, कार्यकारी अभियंता, हतनूर पाटबंधारे विभाग