आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील बैठक लांबल्याने धुळ्यातील पाणीप्रश्न अनुत्तरितच!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- शहरातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. याच विषयावर मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली होती. मात्र दोन दिवसांत बैठकच होऊ न शकल्याने कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही.

शहरातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता महापालिका प्रशासनातर्फे विविध उपाययोजनेच्या दृष्टिकोनातून तयारी सुरू झालेली आहे. महापालिका आयुक्त जीवन सोनवणे सातत्याने पाणीपुरवठय़ाचा आढावा घेत आहेत. पाणी वितरणातील दोष काढून पाण्याची बचत करण्यात येत आहे. यासाठी शहरातील मुख्य जलवाहिनीवरील अवैध जोडण्या आणि गळत्या काढून टाकल्या आहेत. या जलवाहिनीवर विविध शासकीय कार्यालयाच्या जोडण्या होत्या. त्याचप्रमाणे शहरातील नादुरुस्त व्हॉल्व्हही दुरुस्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागातील व्हॉल्व्ह दुरुस्त करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी नवीन व्हॉल्व्ह टाकण्यात येत आहेत. शहरात 38 हजार नळधारक आहेत. त्यातील 550 अनधिकृत नळधारकांना पाणीपट्टी भरून ते अधिकृत करण्यात आले. त्याचप्रमाणे शहरातील विहिरींचा सव्र्हे करण्यात आला आहे. टंचाई काळात नागरिकांना वापरण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे याकरिता उपाय म्हणून विहिरीचा पर्याय आहे. त्यानुसार शहरातील चारही प्रभागात विहिरींचा सव्र्हे करण्यात आला. त्यात शहरातील 35 विहिरीतील पाणी वापरण्यास योग्य असल्याचे निश्चित झाले आहे. या ठिकाणी महापालिकेतर्फे मोटार बसवून त्या भागातील नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशा प्रकारे उपाययोजना करण्यात येत आहेत. टंचाई काळात तापी पाणीपुरवठा योजनेवरून प्रामुख्याने पाणीपुरवठा होणार आहे. त्यासाठी तापी जलवाहिनीवरील 43 लहानमोठय़ा गळत्या काढण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे या वाहिनीची क्षमता 32 वरून 43 एमएलडी करणे आणि बडगुजर ते हनुमान टेकडीपर्यंत जलवाहिनी टाकण्याचा दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव प्राधिकरणाने सादर केला आहे. त्या कामासाठी महापालिकेतर्फे निविदाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. मंजुरीच्या अधीन राहून ही निविदा काढण्यात आली आहे. त्यासाठीच आता मंत्रालयात बैठक होणार आहे. त्यासाठी आयुक्त जीवन सोनवणे, महापौर मंजुळा गावित आणि अभियंता आदी उपस्थित होते. दोन दिवस थांबल्यावरही विविध विभागातील अधिकारी उपस्थित न राहिल्याने ही बैठक होऊ शकली नाही. त्यामुळे पुढील आठवड्यात ही बैठक होईल, अशी अपेक्षा आहे. शहरातील सध्या अतिशय महत्त्वाच्या या विषयाचे गांभीर्य वरच्या पातळीवरील अधिकार्‍यांना वाटत नसावे, असे दिसते. कारण जेवढा उशीर या प्रक्रियेला होईल तेवढे पुढे काम लांबणार आहे. योजना मंजुरीनंतर कामाला सुरुवात होणार आहे. फेब्रुवारीपासून पाण्याची तीव्रता जाणवू लागणार आहे. यासाठी आता ही बैठक केव्हा होते. याकडे लक्ष लागून आहे.

नकाणे गेटचा प्रश्नही प्रलंबित
शहराला पाणीपुरवठा करणार्‍या नकाणे तलावात मृतसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नकाणे तलावाचे गेट मोकळे झाले आहे. मात्र, या गेटचे काम न झाल्याने पाणी वाहून जात होते. पुन्हा पाणी येण्याच्या आत दुरुस्ती पूर्ण करणे गरजेचे आहे.