आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यासाठी जनतेने विश्वास ठेवायचा कुणावर?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल पालिकेच्या जलशुद्धिकरण केंद्र प्रयोगशाळेकडून आल्यानंतर दुसर्‍याच दिवशी सिव्हिलमधील प्रयोगशाळेने तेच पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे कोणाच्या अहवालावर विश्वास ठेवायचा हेच मोठे कोडे आहे. बुधवारी मेहरूण परिसरासह पाणीपुरवठा सभापतींच्या वॉर्डातच जंतुयुक्त पाण्याचा पुरवठा झाला आहे. मग सिव्हिलच्या अहवालानुसार जंतुयुक्त पाणी आरोग्यास योग्य कसे, असा प्रश्न नागरिकांतर्फे उपस्थित केला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून मेहरूण भागासह एमआयडीसीत पिवळ्या रंगाचे व लाल रंगाचे जंतू असलेल्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. तापमानामुळे नागरिकांची प्रकृती बिघडत असताना पाण्यामुळे त्यात भर पडण्याची भीती व्यक्त होत आहे.

पाण्याची टाकी होणार स्वच्छ
महापौर किशोर पाटील यांनी बुधवारी सकाळी 6 वाजेपासून महापालिका व एमआयडीसीच्या जलवाहिनीची पाहणी केली. या वेळी त्यांच्या सोबत कार्यकारी उपअभियंता जे.पी.पवार, एम.एस.पाटील उपस्थित होते. त्यांनी भुसावळ तापी नदीचा पाणीसाठा, जॅक वेलची स्थिती, पीकअप, फिल्टर प्लांट, जीएसआर तसेच मनपा व एमआयडीसीतील वॉश आउट व्हॉल्व्हची तपासणी केली. तसेच तापीचा पाणीसाठा हा पिवळ्या रंगाचा आहे. त्यामुळे तापी महामंडळाने एक आवर्तन सोडावे अशी मागणी केली जाणार आहे. महापौरांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी एमआयडीसीत यापूर्वी पाणीपुरवठा सुरू असलेल्या ठिकाणीदेखील पाण्याची तपासणी करावी, असे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले.

पुन्हा आले जंतूयुक्त पाणी
बुधवारी मेहरूणमधील जोशीवाडासह स्नेहल कॉलनी व नंदनवन कॉलनीतही दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा झाला. पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे सभापती नितीन बरडे यांच्या वॉर्डातही जंतुयुक्त पाणी नागरिकांना मिळाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.

एमआयडीसीचे पाणी थांबविले
बुधवारी मेहरूण परिसरात एमआयडीसीचा पाणीपुरवठा करण्यात आला. त्यात जंतू आढळून आल्याने पाणीपुरवठा थांबविण्यात आला आहे. शनिवारपर्यंत एमआयडीसीचे पाणी न वापरण्याच्या सूचना आहेत. दरम्यान, डाऊन स्कीमचे काम पूर्णत्वाकडे आल्याने गुरुवारी सायंकाळी चाचणी घेण्यात येणार आहे.

आरोग्य विभागाचा अहवालावर संशय
पालिकेतर्फे एमआयडीसीच्या पाण्याचे नमुने आरोग्य विभागाकडे पाठवले होते. तो अहवाल मनपाला दुपारी प्राप्त झाला असून पाणीपुरवठा पिण्यास योग्य असल्याचे म्हटले असल्याचे महापौरांनी सांगितले. यापूर्वी याच पाण्याची तपासणी पालिकेच्या प्रयोगशाळेतून करण्यात आली असून त्यात पाणी पिण्यास अयोग्य म्हटले आहे. मग खरा अहवाल कोणाचा असा प्रश्न उपस्थित होतो.