आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ चार दिवसांपासून पाण्यासाठी भटकंती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - हतनूर धरणातून मंगळवारी शहरासाठी 1 हजार क्युमेक्सचे आवर्तन सोडले असले तरी हे पाणी शुक्रवारी बंधा-यात पोहोचेल. यामुळे पालिकेने शहरात 50 टक्के कपात करताच शहरवासीयांना बुधवारी पाण्यासाठी भटकंती करावी लागली. सर्वच भागांत कमी क्षमतेने पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांनी संताप केला.

येत्या 31 जुलैपर्यंत हतनूर धरणात पालिकेने पाणीसाठा आरक्षित केलेला आहे. या आरक्षणानुसार शहरात पाणीपुरवठ्यासाठी हतनूरमधून 1 जुलैला 1700 क्युसेस पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. हे आवर्तन शुक्रवारी सायंकाळी पालिकेच्या बंधा-यात पोहोचेल. मात्र, यादरम्याचे तीन दिवस शहरात पाणीकपात करणे पालिकेला भाग पडले आहे. कारण पालिकेच्या तापीतील बंधा-यात सध्या केवळ 3 कोटी लिटर्स पाणी उपलब्ध आहे. खालावलेल्या जलपातळीमुळे ताशी 11 लाखांऐवजी केवळ सहा लाख लिटर पाणी उचल होते. गेल्या चार दिवसांपासून ही स्थिती असल्याने शहरातील सर्वच भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

येथे उद्भवली टंचाई
सिंधी कॉलनी, वांजोळा रोड, बंब कॉलनी, जाममोहल्ला, खडका रोड, शिवाजीनगर, विठ्ठल मंदिर वॉर्ड, मॉडर्न रोड, सराफ बाजार परिसर, नाहाटा महाविद्यालयाच्या दक्षिणेकडील भाग, शिवपूर कन्हाळे रोड आदी भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई उद्भवली आहे. नागरिकांना खासगी कूपनलिकांवरून पाणी आणण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

कमी दाबाने पाणीपुरवठा
शहरातील उत्तर भागातील शांतीनगर, सहकारनगर, तापीनगर, खडका रोडवरील काझी प्लॉट, शनि मंदिर वॉर्ड आदी भागांत बुधवारी कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. तब्बल 50 टक्के पाणीकपात करण्याची वेळ पालिकेवर ओढवली. मात्र, रविवारपर्यंत ही समस्या सुटेल, अशी अपेक्षा नागरिकांना आहे.

का निर्माण झाली समस्या
पालिकेने आवश्यकतेनुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात आवर्तनाची मागणी नोंदवली होती. यानुसार 11 जूनला आवर्तन सुटले. मात्र पालिकेच्या बंधा-यापर्यंत पाणी पोहोचलेच नाही. यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी धरणांच्या साठ्याबाबतचे आणि पाणीवाटपाचे अधिकार जिल्हाधिका-यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नवीन आवर्तनास दिरंगाई झाल्याने शहरावर पाणीटंचाई ओढवली. आगामी काळातही तापीच्या गाळामुळे जलशुद्धीकरण प्रक्रिया मंदावून शहरात भीषण पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आगामी काळही धोक्याचा
गेल्या वर्षी तापी नदीपात्रातील पालिकेच्या बंधा-यात पाणी असूनही पंपातील बिघाड, यंत्रणेतील गाळामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता. यावर्षी उन्हाळ्यात समाधानकारक पाणीपुरवठा झाला. मात्र, पावसाळ्याच्या तोंडावर शासकीय उदासीनतेमुळे नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
- तापीनगर, हिंदू हौसिंग सोसायटी, यावल रोड परिसरात मंगळवारी रात्री 12 वाजता पाणीपुरवठा झाला.
- वीजभारनियमन आणि वारंवार खंडित होणा-या वीजपुरवठ्यामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यत येत आहे.
- वांजोळा रोडसह राष्ट्र ीय महार्गाच्या पलीकडील वाढीव कॉलन्यांमध्ये चार दिवसांपासून पाणीटंचाई कायम आहे.
- बहुतांश भागात गेल्या तीन ते चार दिवसांपासून मध्यरात्री पाणीपुरवठा होत असल्याने नाराजी वाढली आहे.

पाण्याची बचत हवीच
- पालिकेने टंचाईवर मात करण्यासाठी आवर्तन मिळवले. मात्र, नागरिकांनी वैयक्तिक जबाबदारी ओळखून पाण्याची बचत करावी. हतनूर धरणातूनच पाणी मिळत नसल्याने कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. उमेश नेमाडे, नगराध्यक्ष, भुसावळ

पाणीकपात करणार
- शहराला रविवारनंतर पुरेशा प्रमाणात पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न असेल. मात्र, पाऊस पडून धरणातून विसर्ग होत नाही, तोपर्यंत 20 टक्क्यांपर्यंत पाणीकपात करण्यात येईल. यामुळे 21 दिवसांऐवजी 25 दिवसांचा साठा कायम राहील. ए.बी.चौधरी, मुख्य अभियंता,पाणीपुरवठा विभाग

रेल्वे हद्दीत दिवसातून एक वेळा पाणीपुरवठा
हतनूर धरणाचे आवर्तन वेळेवर न मिळाल्याने तापी नदीपात्रातील रेल्वेच्या बंधा-याची जलपातळी खालावली आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचारी, अधिका-यांची निवासस्थाने, रेल्वे यार्डातील कार्यालयांसाठी दिवसातून एक वेळा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. गेल्या दोन दिवसांपासून निर्णयाची अंमलबजावणी करून 40 टक्के पाणीकपात केली आहे.

रेल्वे विभाग तापीपात्रातील बंधा-यातून पाणी उचलून ते आयुध निर्माणी जवळील साठवण तलावात टाकते. तेथून जलवाहिनीद्वारे हे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचते. प्रक्रिया करून ते कर्मचारी, अधिका-यांची निवासस्थाने व कार्यालयांपर्यंत पोहोचवले जाते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून साठवण तलावातील जलसाठ्यात कमालीची घट झाली आहे. म्हणून रेल्वे प्रशासनाने हतनूर धरणाचे आवर्तन बंधा-यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत अर्थात गुरुवार किंवा शुक्रवारपर्यंत दिवासातून दोनऐवजी एक वेळा पाणीपुरवठा करण्याचे धोरण अवलंबवले आहे. दररोज साधारणपणे 1 कोटी 10 लाख लिटर पाणीपुरवठा केला जायचा. यात आता 55 लाख लिटर पाण्याची बचत होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

रेल्वेच्या साठवण तलावात समाधानकारक जलसाठा उपलब्ध होताच पुन्हा दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा केला जाणार आहे. तापी नदीपात्रातील बंधा-यात शुक्रवारी दुपारपर्यंत हतनूरचे आवर्तन पोहोचणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

निर्णयाची अंमलबजावणी
- टंचाईच्या पार्श्वभूमीवर दिवसातून एक वेळा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. निर्णयाची अंमलबजावणी गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. साठवण तलावात गुरुवारपर्यंत समाधानकारक जलसाठा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्यात येईल. राजेंद्र देशपांडे, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, रेल्वे

फोटो - मात करण्यासाठी खासगी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. छाया : कालू शहा