आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टंचाई : गावागावांमध्ये वाढले मतभेद; पाणीहक्कावरून वाद पेटला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर - पाऊस लांबल्यामुळे धरणांतील उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याच्या हक्कावरून वाद उद्भवले असून गावागावातील नागरिक आमनेसामने उभे ठाकत आहेत. वाघारी पाटखेडा ग्रामपंचायतीने सूर तर गोंडखेल ग्रामपंचायतींने पाळधी साठवण तलावातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. सूर धरणातील पाणी सोडण्यासाठी पोलिस बंदोबस्त घेण्याची वेळ प्रशासनावर आली असून गोंडखेलचा प्रश्न मात्र अद्यापही कायम आहे.

तालुक्यातील सूर व पाळधी साठवण तालुक्यात ब-यापैकी पाणीसाठा आहे. या धरणाखाली नदीमार्गावर येत असलेल्या अनुक्रमे वाघारी पाटखेडा ग्रामपंचायतीने 30 दलघफू व गोंडखेल ग्रामपंचायतींनी 20 दलघफू पाणी सोडण्याची मागणी जिल्हाधिका-यांकडे केली होती. त्यानुसार तहसीलदार चंद्रकांत देवगुणे व पाटबंधारे विभागाचे अधिकारी पाणी सोडण्यासाठी पाहणी करावयास गेले असता धरणांजवळील कापूसवाडी व पाळधी ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे पाणी सोडण्याच्या विचाराने गेलेल्या प्रशासकीय अधिका-यांना पाणी न सोडताच परत फिरावे लागले होते. अखेर लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता आर.टी.पाडसे यांनी जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार बुधवारी पोलिस निरीक्षक रफिक शेख यांच्यासह बंदोबस्त घेऊन सूर धरणातील 15 दलघफू पाणी सोडले. धरणातून पाणी सोडले जाऊ नये, यासाठी कापूसवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, प्रशासनाचे आदेश व पोलिस बंदोबस्त पाहता पाणी सोडण्यास प्रशासनाला यश आले. सूर धरणातून पाणी सोडण्यात आले असले तरी पाळधी ग्रामस्थांचा प्रखर विरोध पाहता प्रशासनाने अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. आरक्षित केलेले असल्याने संबंधित ग्रामपंचायती पाण्यावर हक्क दाखवित असून बुडीत क्षेत्रात जमिनी गेलेले शेतकरीही आपला हक्क दाखवू लागले आहेत.
पाटबंधारे अधिका-यांवर आरोप
कापूसवाडी धरणावरून विदर्भातील अनेक गावांसह तालुक्यातील कापूसवाडी, रांजणी, बेटावद बुद्रूक, बेटावद खुर्द, गोरनाळा अशा 20 ते 25 गावांच्या पाणीपुरवठा योजना आहेत. नदीपात्रातून सोडलेले पाणी कोणत्याही गावाची तहान भागवू शकणार नाही. नदीकाठच्या शेतक-यांची ही चाल असून सर्व पाणी शेतीसाठी उपसले जाईल. आजघडीला सर्वच गावांच्या योजना कार्यान्वित असून पाटबंधारे विभाग अधिका-यांनी आर्र्थिक स्वार्थासाठी टंचाई असल्याचे ग्रामपंचायतींकडून खोटे ठराव घेतले, असे आरोप पाणी सोडण्यास विरोध करणा-या जमावाने केला.

पाण्याचे राजकारण
धरणाखालील गावांमध्ये पाणीटंचाई असल्याचे ठराव ग्रामपंचायतींकडून दिले जाऊन नदीमार्गे पाणी सोडण्याची मागणी केली जाते. मात्र, कोरड्या पडलेल्या नद्या व त्यातील डोह भरण्यातच 90 टक्के पाणी व्यर्थ जाते. नदीतील घाण पाणी पिण्यास योग्य नसते. असे असताना गावपातळीवरील काही पदाधिकारी व पाटबंधारे विभागाचे कर्मचारी नदीकाठच्या शेतक-यांकडून आर्थिक स्वार्थ साधून पाणी सोडत असल्याचे आरोप होतात तर काही धरणांतून दुस-या धरणांमध्ये पाणी सोडण्याची मागणी ही केवळ मत्स्य व्यवसायासाठी होते, असेही आरोप सुज्ञ नागरिक करतात.
आदेशानुसार सोडले पाणी
- गावागावातील ग्रामपंचायतींनी पिण्याच्या पाण्यासाठी धरणांतील पाणी आरक्षित केलेले असते. त्यासाठी ग्रामपंचायती जिल्हाधिकारी कार्यालयात रीतसर पैसे भरतात. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार पाणी सोडणे, हे आमचे कर्तव्य आहे. यात वैयक्तिक देवाण-घेवाणीचा विषय नाही. आर.टी.पाडळसे, उपअभियंता, लघु पाटबंधारे विभाग

फोटो - कापूसवाडी ग्रामस्थांचा विरोध झुगारून पाणी सोडताना उपअभियंता आर.टी.पाडळसे व कर्मचारी.