आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीगळतीचे सत्र अजूनही सुरूच; आज पाणीपुरवठा बंद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव: शहरातील विविध भागांतील पाणीगळती थांबविण्यासाठी महापालिकेतर्फे दोन महिन्यांपूर्वी वाघूरच्या मुख्य वाहिनीची दुरुस्ती करण्यात येऊनही गळती थांबलेली नाही. त्यातच गिरणा टाकीलगत गळती सुरू झाल्याने रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे महापालिकेतर्फे रविवारी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून, या परिसरातील पाणीपुरवठा एक दिवस लांबणार आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे शहरातील पाणीगळती थांबविण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी वाघूरच्या मुख्य जलवाहिनीवरील प्रमुख गळत्यांची दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानुसार जळगावकरांना सुरळीत पाणीपुरवठा मिळणार असल्याचा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला होता; मात्र महिना उलटत नाही तोच पुन्हा विविध भागांतील गळत्यांमुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जलकुंभाजवळ (गिरणा टाकी) वाघूरची 1000 एम.एम.ची मुख्य वाहिनीच्या गळतीला सुरुवात झाली आहे. या गळतीमुळे शनिवारी परिसरातील रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात पाणी वाहत होते. तेथे खोदल्याशिवाय वाघूरच्या मुख्य वाहिनीच्या गळतीचे कारण कळणार नसल्याचे कनिष्ठ अभियंता सुहास चौधरी यांनी स्पष्ट केले. तसेच पाणीपुरवठा विभागप्रमुख अ.वा.जाधव यांनी रविवारी गळतीचे काम करण्यात येणार असल्याने या भागातील पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात येणार असल्याचे ‘दिव्य मराठी’ला सांगितले.