आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

EXCLUSIVE - पाण्याचा हिशोब ठेवण्यासाठी शहरात 300 ठिकाणी मीटर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - बेसुमार नासाडी होणार्‍या अमूल्य पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जगभरात विविध प्रयत्न सुरू आहेत. या पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन पालिका प्रशासनानेही शासनाच्या सुजल निर्मल अभियानांतर्गत महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत वाघूर धरण ते जलकुंभांपर्यंत 30 ठिकाणी वॉटरमीटर बसविण्यात आले आहेत. यापुढे शहरातील उपजलवाहिन्यांवरही 300 ठिकाणी वॉटरमीटर लावण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू आहेत. त्यामुळे पाण्याचा योग्य हिशोब ठेवणे पालिकेला शक्य होईल.
पाण्याची उचल अन् पुरवठा समजणार
सुजल निर्मल अभियानांतर्गत जळगाव शहरासाठी पाण्याची होणारी उचल आणि प्रत्यक्ष पुरवठा याचे गणित जुळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुजल निर्मल अभियानांतर्गत केलेल्या एका सर्वेक्षणात शहरातील पाणीगळतीचे प्रमाण 47 टक्के दाखवण्यात आले होते. त्याचा खोलवर अभ्यास करण्यासाठी पहिल्या टप्प्यात वाघूर धरणातून पाणी उचल होणार्‍या मुख्य जलवाहिनीवर नुकतेच वॉटरमीटर लावण्यात आले आहे. यापूर्वी शहरातील जलकुंभांजवळ 30 ठिकाणी वॉटरमीटर लावण्याचे काम पूर्ण झाले असून, अजून दोन ठिकाणी वॉटरमीटर लावण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.
आता व्हॉल्व्हमनची जबाबदारी होईल उघड
उपजलवाहिन्यांवर 300 ठिकाणी मीटर लावल्यानंतर कु ठल्या जलवाहिनीवरून किती तास पाणीपुरवठा झाला, याचे मोजमाप करणे शक्य होणार आहे. त्यामुळे एखाद्या भागात कमी किंवा अधिक वेळ पाणी सोडले गेल्यास त्याची माहितीही प्रशासनासमोर उघड होणार आहे. त्या भागातील नळजोडण्यांची आकडेवारी आणि त्यासाठी लागणारे पाणी याचे गणित समोर येऊन मागणीपेक्षा अधिक पाणी जात असल्यास अनधिकृत नळ संयोजनेही उघड होणे शक्य आहे.
दर दोन तासाला कळेल पाण्याच्या वापराची माहिती
सध्या जलकुंभांवर लावण्यात आलेल्या वॉटरमीटरवरील नोंदी पालिका कर्मचार्‍या ंना घ्याव्या लागत आहेत. त्याऐवजी वॉटरमीटरवर अद्ययावत सेन्सर लावून दर दोन तासाला मीटररीडिंग पालिकेतील संगणकावर उपलब्ध होईल, अशी यंत्रणा बसवण्याच्या विचारात प्रशासन आहे. त्यासाठी सुमारे 6 लाख रुपये खर्च येणार आहे. मात्र, एकदा ही यंत्रणा बसवली गेल्यास कुठल्या जलकुंभात किती पाणी पडले, कुठे पुरवठा बंद आहे याबाबतची अद्ययावत माहिती प्रशासनाला बसल्या जागीच उपलब्ध होणार आहे.
उचललेल्या पाण्यात आहे तफावत
वाघूर धरणातून उचल होणारे पाणी उमाळा जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी धरणाच्या पायथ्याशी पालिकेचे पंपिंग स्टेशन आहे. या स्टेशनमध्ये लावलेल्या पंपांच्या हॉर्सपॉवरच्या गणिताच्या आधारे उचल होत असलेल्या पाण्याचे मोजमाप सुरू होते. मात्र, वॉटरमीटर लावल्यानंतर हाती येत असलेली आकडेवारी आणि यापूर्वीची गृहीत धरलेल्या आकडेवारीत प्रचंड तफावत असल्याचे समोर आले आहे.
जलकुंभांत पडणार्‍या पाण्याचीही मोजणी
धरणातून जलकुंभांमध्ये पडणारे पाणी या माध्यमातून मोजण्याचे कामही सुरू झाले आहे. यापुढे जाऊन शहरातील विविध कॉलन्यांना पाणीपुरवठा करणार्‍या 300 उपजलवाहिन्यांद्वारे किती पाणी वितरित केले जाते, याचेही मोजमाप केले जाणार आहे. त्यासाठी या उपजलवाहिन्यांवर लहान स्वरूपाचे वॉटरमीटर लावण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. सुजल निर्मल अभियानांतर्गत राज्य शासनाकडून अशा प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो.