आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Pipe Line Break At Jalgaon For Jain Irrigation Employees Hand

जळगावात जलवाहिनी फोडली; ‘जैन इरिगेशन’च्या कामगारांचा बेजबाबदारपणा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जैन इरिगेशनसाठी एमआयडीसीकडून पाणी घेण्याकरीता जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी खोदकाम सुरू असताना गुरुवारी रात्री सुप्रीम कॉलनीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. त्यामुळे शुक्रवारी या भागात होणारा पाणीपुरवठा खंडित झाला होता. महापालिकेने तातडीने जोडणी केली. त्यामुळे दुपारी 4 वाजेनंतर या भागाला पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र, ही जलवाहिनी फुटल्यामुळे गुरुवारी रात्री हजारो लिटर पिण्याचे पाणी नाल्यात वाहून गेले.

जैन इरिगेशन उद्योग समूहाला पाण्याची गरज असल्याने त्यांनी एमआयडीसीकडून पाणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीकडून एमआयडीसी ते मेहरूण तलावापर्यंत 12 इंच व्यासाची नवीन जलवाहिनी टाकण्यात येते आहे. महामार्गाच्या पलीकडून सुप्रीम कॉलनीकडे जलवाहिनीसाठी गुरुवारी रात्री खोदकाम करण्यात आले होते.

कामगारांकडून करण्यात येत असलेल्या खोदकामात जमिनीखाली असलेल्या महापालिकेच्या 6 इंच व्यासाची जलवाहिनी फुटली. पाणीपुरवठा सुरू नसल्याने रात्री जलवाहिनी फुटल्याचे लक्षात आले नाही. मात्र, शुक्रवारी पहाटे सुप्रीम कॉलनीचा पाणीपुरवठा करण्याचा दिवस असल्याने पाणी सोडताच महामार्गालगत धनदाईमाता मंदिरासमोर मोठय़ा प्रमाणात पाणीगळती सुरू झाली.

नाल्यात मोठय़ा प्रमाणावर पाणी वाहून जात असल्याची बाब व्हॉल्व्हमनच्या लक्षात येताच त्याने पुरवठा तातडीने बंद केला. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे तातडीने फुटलेली जलवाहिनी जोडत दुपारी 4 वाजेनंतर सुप्रीम कॉलनीतील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला असल्याचे महापालिकेतर्फे सायंकाळी सांगण्यात आले.

रीतसर परवानगी घेतली होती
आम्ही एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभागाची रीतसर परवानगी घेतली आहे. या संदर्भात मनपाचीही परवानगी ओघाने आलीच. त्याप्रमाणे त्यांच्याही परवानगीबाबत रीतसर कार्यवाही केली. मजुरांकडून काम करून घेताना जलवाहिनी लिक झाल्याचे लक्षात आले. मनपा अधिकार्‍यांशी चर्चेनंतर दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य स्वखर्चाने आणून देऊन काम केले. मजूरही उपलब्ध करून दिले.
-दीपक रावतोळे, साइट इंजिनिअर, जैन इरिगेशन


विनापरवानगी कामाचा फटका
महापालिका हद्दीतून जलवाहिनी टाकताना जैन इरिगेशनने आमच्याकडून कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. त्यामुळे ही घटना घडली. झालेल्या नुकसानीपोटी दुरुस्तीचे साहित्य त्यांच्याकडून घेण्यात आले. महापालिका कर्मचार्‍यांनी तातडीने फुटलेल्या पाइपलाइनची जोडणी करून पाणीपुरवठा सायंकाळी सुरळीत केला आहे.
-अ. वा. जाधव, विभागप्रमुख, पाणीपुरवठा