आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाइपलाइनचे काम बंद करा; जलकुंभ उभारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - पाणीपुरवठा योजनेच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे पाइपलाइनचे काम तातडीने बंद करा आिण जलकुंभांची कामे सुरू करा, असे आदेश ठेकेदाराला देण्यात आले आहेत. महापौर आयुक्तांनी हे आदेश दिले. त्याचबरोबर पाणीपुरवठा योजनेची त्रयस्त यंत्रणेकडून तपासणी केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
पाणी योजनेच्या ठेकेदाराला शनिवारी बोलावण्यात आले होते. आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांच्या दालनात झालेल्या बैठकीत ठेकेदाराचे प्रतिनिधी हजर होते. तब्बल अडीच तास ही बैठक सुरू होती. बैठकीनंतर माहिती देताना महापौर जयश्री अहिरराव यांनी सांगितले की, शहरात ठेकेदारातर्फे सुरू असलेले पाइपलाइनचे काम तत्काळ बंद करण्यात यावे. त्याऐवजी जलकुंभाचे काम सुरू करण्यात यावे. त्यानुसार चक्करबर्डी शांतिनाथनगर येथे जलकुंभाचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती या वेळी देण्यात आली. तर आनंदनगर येथेही लवकरच जलकुंभाचे काम सुरू करण्यात येणार आहे. मात्र, महापालिकेने वारंवार सांगितल्यावरही शहरात पाइपलाइनचे काम सुरू होते. हेही यातून स्पष्ट होते. कारण आता हे काम बंद होणार आहे. शहरात आतापर्यंत ९५ किलोमीटर पाइपलाइनचे काम करण्यात आले असल्याची माहिती ठेकेदाराचे प्रतिनिधी राजेश खन्ना यांनी दिली. जुन्या कामांचा तक्ता सादर करण्याचे या वेळी सांगितले. या वेळी आयुक्त डॉ. नामदेव भोसले, स्थायी समिती सभापती चंद्रकांत सोनार, विरोधी पक्षनेते संजय जाधव, सभागृह नेते कमलेश देवरे, तांत्रिक समितीचे राहुल कुंभार, नितीन पाटील, आनंद अंधारे ठेकेदाराचे प्रतिनिधी राजेश खन्ना, अनिल पाटील, मनपा अभियंता कैलास शिंदे उपस्थित होते.

डिझाइनला उशीर
पाणीपुरवठायोजनेत अटी, शर्तीनुसार प्रथम जलकुंभाचे काम सुरू करावयाचे होते; परंतु पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. कारण जलकुंभाचे डिझाइन येण्यास उशीर लागत असल्याने महापालिकेचे कार्यकारी अभियंता यांनी शहराबाहेरील ज्या भागात दूषित पाण्याची समस्या आहे. तेथे पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू करण्याची सूचना ठेकेदाराला करण्यात आल्याची माहिती या वेळी प्रतिनिधीने दिली होती. जलकुंभाच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्या जागांची पाहणीही झाली आहे. केवळ काम सुरू करणे हा त्यातील एक भाग आहे. तो लवकरच सुरू होईल.

परवानगी घ्यावी लागेल
शहरातपाइपलाइन टाकण्याचे काम पूर्णत: बंद करण्यास सांगितले आहे. मात्र, शहरात काही भागात पाइपलाइन टाकण्याचे काम तातडीने करावेच लागेल तेथेच हे काम करण्यात येईल; परंतु त्यासाठी आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांची परवानगी घ्यावी लागेल. तर त्याची माहिती महापौर, विरोधी पक्षनेते यांनाही द्यावी लागणार आहे.

प्राधिकरणा कडून चौकशी
पाणीपुरवठायोजनेचे काम शहरात सुरू करण्यात आले. त्यात अनियमित कामांच्या तक्रारी करण्यात आल्या आहे. तसे तांत्रिक समितीच्या अधिकाऱ्यांनी लेखीही दिले आहे. िवरोधी पक्षाच्या नगरसेवकांनीही तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे त्या कामांची चौकशी शासन जीवन प्राधिकरणाकडून करणार आहे. त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. ठेकेदाराच्या प्रतिनिधींना योजनेतील त्रुटी सांगताना सभापती चंद्रकांत सोनार, महापौर आयुक्त.

ठेकेदाराची पुन्हा अनुपस्थिती
पाणीपुरवठा योजनेच्या कामाच्या चौकशीसाठी महापालिका प्रशासनाकडून समिती तयार केली होती. त्या वेळी बैठकीला ठेकेदाराला बोलावले होते. मात्र, प्रतिनिधीला पाठविले होते. त्यानंतरही वारंवार ठेकेदाराने प्रतिनिधीला पाठविले होते. आताही पुन्हा ठेकेदार घुले आलेच नाही. प्रतिनिधीच उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...