आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलवाहिनी फुटली; ५० फुटांवर पाणी , शहरातील जलकुंभांवरून एक दिवस उशिरा होणार पाणीपुरवठा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शिंदखेडा तालुक्यातील बाभळे जलशुद्धीकरण केंद्रासमोर असलेल्या मुख्य जलवाहिनीला शुक्रवारी दुपारी गळती लागली. प्रेशरमुळे सुमारे दोनमजली इमारतीच्या उंचीपर्यंत पाण्याचा कारंजा निर्माण झाला होता. जुन्या ठिकाणी प्रेशरमुळे ही जलवाहिनी फुटली. त्यामुळे उद्या शनिवारी सुमारे नऊ जलकुंभांचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने होणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली अाहे.
एेन दुष्काळी स्थितीत तापीची जलवाहिनी धुळेकरांची तहान भागवत आहे. शुक्रवारी दुपारी बाभळे जलशुद्धीकरण केंद्राजवळ असलेल्या या मुख्य वाहिनीला पाण्याचा प्रेशरमुळे तडा गेला. त्यामुळे यापूर्वी करण्यात आलेले वेल्डिंग कामही निघाले. परिणामी सुमारे शंभर फुटांपर्यंत उंच पाण्याचा फवारा वाहत होता. यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्याचे लक्षात येताच जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांनी पाणीपुरवठा बंद केला. त्यामुळे पाण्याची नासाडी थांबली; परंतु तोपर्यंत बऱ्याच प्रमाणात पाणी वाया गेले होते. शिवाय पाण्याच्या प्रवाहामुळे महामार्गावरील काही वाहने थांबली होती. जलवाहिनीला गळती लागल्याचे समजताच महापालिकेचे पदाधिकारी रवाना झाले. शिवाय पाणीपुरवठा विभागाचे पथकही बाभळे गावाकडे दुपारी गेले होते. या पथकातील नरेंद्र बागुल, शकील पठाण, एकनाथ पाटील इतरांनी कामाला सुरुवात केली. सायंकाळपर्यंत जलवाहिनीचे बहुतांशी काम झाले होते; परंतु प्रेशरमुळे पुन्हा या वाहिनीला गळती लागू शकते. त्यामुळे उद्या शनिवारी पुन्हा या ठिकाणी डागडुजी केली जाणार आहे. त्यामुळे देवपूरसह सुमारे नऊ जलकुंभांचा पाणीपुरवठा शनिवारी होणार नाही. या तांत्रिक अडचणीमुळे किमान एक दिवस उशिराने पाणीपुरवठा होणार असल्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना सहाव्या दिवशी पाणी मिळेल.

जलवाहिनीच्या जॉइंट दुरुस्तीचे काम त्वरित करणार
^मुख्यजॉइंटअसलेल्या ठिकाणीच गळतीचा प्रकार घडत आहे. अतिदाबाने हे सगळे घडते. त्यामुळे जॉइंट दुरुस्तीचे काम तातडीने शनिवारी केले जाणार आहे. त्यासाठी मनपाचे पथक कार्यरत असेल. कैलास शिंदे, पाणीपुरवठाअभियंता, मनपा
महापौरांनी दिली केवळ एमबीआरपर्यंत भेट

तापी जलवाहिनी शहराला पाणीपुरवठा करणारी एकमेव जलवाहिनी आहे. त्यामुळे यातून वाया जाणारे पाणी वाचविण्याची गरज आहे. त्याची पाहणी महापौर जयश्री अहिरराव यांनी शुक्रवारी केली; परंतु ती शहरापुरतीच मर्यादित राहिली.

हे आहेत नऊ जलकुंभ
देवपूर,मायक्रो टॉवर, बडगुजर प्लॉटमधील जलकुंभ, दसेरा मैदान जलकुंभ, चक्करबर्डी, ऑक्सिडेशन जलकुंभ आणि मोहाडी येथील जलकुंभाचा पाणीपुरवठा एका दिवसासाठी लांबला आहे. त्यामुळे या जलकुंभांवर अवलंबून असलेल्या कॉलनी, वसाहती यांनाही एक दिवस उशिराने पाणीपुरवठ्याची झळ सोसावी लागणार आहे.


जाॅइंटनंतर जाॅइंट...
गळती लागलेल्या ठिकाणी यापूर्वी दोनदा वेल्डिंग करण्यात आले होते. सलग दोन वेळेस एकाच ठिकाणी गळती वेल्डिंग केल्यामुळेच हा जाॅइंट तकलादू झाला आहे. जलवाहिनीतून अधिक प्रेशरने पाणी जाताच वेल्डिंग तुटून गळती लागते. आता पुन्हा तिसऱ्यावेळी गळती लागल्यावर तरी पुन्हा त्याच ठिकाणी वेल्डिंग करायला नको. अन्यथा जॉइंट नंतर जाॅइंट गळतीचा हा कित्ता पुन्हा चौथ्यावेळी गिरविला जाऊ शकतो. त्यामुळे पथकाने सतर्क राहायला हवे.

दीड लाख लिटर पाणी वाया...
बाभळेजलशुद्धीकरण केंद्र शहराकडे येणारी जलवाहिनी अशा जॉइंट असलेल्या ठिकाणी तिसऱ्यांदा ही सर्वाधिक मोठी गळती लागली आहे. जवळपास दीड लाख लिटर पाणी या मोठ्या गळतीतून वाहून गेले. पाण्याचे फवारे ५० फुटांपेक्षा जास्त वर जात असल्यामुळे थेट महामार्गावर पाणी येत होते. त्यामुळे बराच काळ वाहतूकही थांबवून ठेवण्याची वेळ आली. ही गळती महापालिकेच्या पथकाकडून आतापर्यंत थांबविण्यात आलेली नाही. त्यामुळे वारंवार एकाच ठिकाणी गळती लागण्याचे प्रमाण वाढत आहे.

दुसऱ्या दिवशीही जलसंकट...
बाभळेजलशुद्धीकरण केंद्राजवळ तांत्रिक अडचणी निर्माण होऊन शहराचा पाणीपुरवठा खंडित होण्याची ही दुसरी घटना आहे. गुरुवारी वीजपुरवठा खंडित झाल्याने शहराला पाणी पुरविणे कठीण झाले. यानंतर शुक्रवारी गळती लागली. या दोन्ही घटनांनी शहराच्या पाणीपुरवठ्याच्या क्रमवारीत मात्र बदल झाला आहे.