आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Pipeline Through Drainage Line In Chalisgaon

जीर्ण जलवाहिन्यांचा मार्ग 30 वर्षांपासून नालींमधून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव - शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिकेने सुमारे तीन ते चार दशकांपूर्वी विविध भागांमध्ये टाकलेल्या पाण्याच्या जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. तर बहुतांश जलवाहिन्यांचा मार्ग हा गटारी व नाल्यांमधून गेल्यामुळे येणाºया काळात यातून दूषित पाणीपुरवठा होण्याची शक्यता वाढली आहे. यासाठी जीर्ण झालेल्या व गटारींतून गेलेल्या जलवाहिन्या बदलण्याची गरज आहे.

‘दिव्य मराठी’ने केलेल्या सर्वेक्षणात शहरातील बहुतांश ठिकाणच्या जीर्ण जलवाहिन्यांमधून पाण्याची गळती होताना दिसत आहे. तर अनेक ठिकाणी गटारी व नाल्यांमध्ये जलवाहिन्यांना जोड देण्यात आल्यामुळे त्यातून गटारींचे व नदी-नाल्यांतील सांडपाणी थेट जोडलेल्या ठिकाणी शिरण्याचा धोका वाढला आहे. यासाठी पालिका प्रशासनाने उपाययोजना आखून जीर्ण जलवाहिन्यांचे सर्वेक्षण करावे. त्यामुळे जलवाहिनीद्वारे होणारा दूषित पाणीपुरवठा रोखता येऊ शकतो. जलवाहिनीत सोडलेल्या पाण्याच्या पे्रशरमुळे दूषित पाण्याचे प्रमाण नागरिकांना दिसून येत नाही. तरीही पालिकेने काळजी घेत पाण्याच्या टाक्यांमध्ये नियमित टीसीएल पावडरचा वापर सुरू केला आहे.

पावसाळ्यापूर्वी पाणीपुरवठ्याच्या जलवाहिन्यांतून होणारी पाण्याची गळती व दुर्गंधी रोखण्यासाठी प्रयत्न करावा. शहरातील बहुतांश ठिकठिकाणी जलवाहिन्यांचे लिकिजेस, गळती, तुटलेली पाइपलाइन बदलणे व इतर कामे तातडीने मार्गी लावल्यास साथीचे आजार उद्भवणार नाहीत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य चांगले राहू शकते. बहुतांश आजार हे दूषित पाण्यामुळे होत असतात, यासाठी खबरदारी घेतली पाहिजे.

जलवाहिन्यांवरून सांडपाणी
नदीपात्रात वाहणारे दूषित सांडपाणी थेट पिण्याच्या पाइपलाइनमधून आत शिरून आरोग्याला धोका पोहचू शकतो. नागरिकांनी अनेकवेळा पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु याची दखल घेतली जात नाही. मागील 35 ते 40 वर्षांपूर्वी टाकण्यात आलेल्या जलवाहिन्यांची मर्यादा जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे. अशा ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकण्याची आवश्यकता आहे. जीर्ण झालेल्या जलवाहिन्यांची क्रॉसिंग थेट तितूर नदीपात्रातून असल्यामुळे हा धोका अधिक वाढला आहे.

75 कोटींची योजना अंतिम टप्प्यात
नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी मिळावे, यासाठी आमदार राजीव देशमुख यांच्या प्रयत्नातून 75 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच शहरवासीयांना शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा होईल. याचबरोबर जीर्ण झालेली पाइपलाइन बदलविण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

हायड्रालिक सिस्टिमचा वापर
- शहरात मागील तीन ते चार दशकांपूर्वी टाकण्यात आलेल्या व जीर्ण झालेल्या जलवाहिन्या हायड्रालिक पद्धतीचा वापर करून बदलविण्यात येणार आहेत. यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून सर्वेक्षण करण्यात येऊन तसा प्रस्ताव तयार करण्यात येईल. सुरळीत व जलदगतीने जलवाहिन्यांतून नागरिकांना पाणी पोहोचविण्याची व्यवस्था लवकरच करण्यात येईल.
रवींद्र जाधव, मुख्याधिकारी
पाण्याची गळती रोखावी
शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने पाण्याची गळती व चोरी रोखण्याची आवश्यकता आहे. शहरात बहुतांश ठिकाणी अनधिकृत नळकनेक्शन आहेत. पालिकेने यापूर्वी शोध मोहीम सुरू केली होती. त्यात काही अनधिकृत नळकनेक्शन तोडण्यात आले होते. तर अनेक ठिकाणी लहान मोठ्या लिकिजेसमुळे नळांना दूषित पाणीपुरवठा होतो. याचा शोध घेऊन नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.