आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमजीपीसमोर पाणी योजनेचे वाभाडे, तांत्रिक चुकांमुळे योजनेच्या कामातही मोठ्या प्रमाणात निघाल्या विविध त्रुटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - ठेकेदारानेस्वत:च खड्डे खोदून ते जीवन प्राधिकरणाच्या मुंबईहून आलेल्या समितीला दाखवले. मात्र, नागरिकांनी ठेकेदाराच्या कामाचा भंडाफोड केला. त्यानंतर समितीनेच स्वत:हून जमिनीत गाडलेली पाइपलाइन उकरून काढत त्या कामाचे माप घेतले, तेव्हा ठेकेदाराने केलेली दिशाभूल उघड झाली. त्याचबरोबर पाणी योजनेच्या कामाचेही वाभाडे निघाले. समितीमधील अधीक्षक अभियंता मनीषा पलांडे यांनी तर कामाचे नमुने पाहिल्यानंतर स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. या त्रुटी असलेल्या कामाच्या माहितीचा अहवाल थेट मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाणार आहे. उद्या मंगळवारीही ही समिती शहरातील तक्रारी असलेल्या इतर ठिकाणच्या कामांची पाहणी करणार आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या तीन अभियंता सदस्यांची समिती सोमवारी दाखल झाली. या समितीने शहरात पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनचे काम तसेच जलकुंभाच्या कामाची पाहणी केली आहे. या वेळी समितीमधील अधीक्षक अभियंता मनीषा पलांडे यांनी प्रत्यक्ष कामांची पाहणी केली. त्यात त्यांना तांत्रिक सल्लागार समितीच्या कामात अनेक चुका आढळल्या. समितीने सर्किट हाऊस येथे योजनेची प्राथमिक माहिती घेतली. चक्करबर्डी येथील कामाची पाहणी केल्यानंतर तांत्रिक सल्लागार समितीच्या प्रतिनिधींना सूचना केल्या. या कामावरील सुपरवायझर बदलण्याचीही सूचना करण्यात आली. दुपारी दोन वाजेच्या सुमारास श्रीरंग कॉलनी येथील पाइपलाइनची पाहणी केली. तेथे ठेकेदाराच्या प्रतिनिधीने दाेन खड्डे खोदून ठेवले होते. त्याच जागेवर जाऊन समितीने मोजमाप केले. त्याची लांबी, रुंदी आणि नोंद केलेले कागदपत्र, नकाशा यांची पाहणी केली. याच कॉलनीत पूर्वी भाजपचे अनूप अग्रवाल यांनी तक्रार केली होती. मात्र ते लक्षात आणून दिले. त्यानंतर तिथे नव्याने खड्डे खोदण्याची सूचना पलांडे यांनी केली. या पथकात अधीक्षक अभियंता मनीषा पलांडे, उपअभियंता एस. जी. माने, शाखा अभियंता एस. जी. जुवेकर यांचा समावेश आहे.

खड्डे खोदून करणार पाहणी
पाणीपुरवठायोजनेत कामाच्या झालेल्या तक्रारीप्रमाणे समितीने सोमवारी केलेल्या पाहणीत बऱ्याच ठिकाणी तांत्रिक दोष आढळले. त्यामुळे उद्या मंगळवारी समितीने सांगितलेल्या पंचवीस जागेवर खड्डे खोदून ठेवण्याच्या सूचना ठेकेदाराला केल्या आहेत.

साहित्याचीही केली पाहणी
ठेकेदारानेपाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी मागवलेले पाइप, व्हॉल्व्ह साहित्य उघड्यावर पडलेले होते. त्याची पाहणी केली. या वेळी साहित्य कधीपासून मागविले आहे. तसेच पाइप उघड्यावर ठेवल्याने ते खराब होत असल्याचीही नोंद घेतली. कामासाठी वापरलेल्या साहित्याचीही नोंद मागितली आहे. उन्हामुळे खराब झालेले साहित्य योजनेत वापरले जात आहे काय, असा प्रश्न विचारून त्याची तजवीज लावण्याची सूचना करण्यात आली.

ठेकेदार,पीएमसीमध्ये समन्वय नाही
शहरातपाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या कामांत अनेक तांत्रिक चुका झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. कारण ठेकेदार त्याच्या मर्जीप्रमाणे काम करीत आहे. त्याचप्रमाणे काम तांत्रिकदृष्ट्या याेग्य होण्याकडे पीएमसीचे लक्ष नाही. त्यांना त्याची माहिती देता येत नाही. कागदोपत्री नोंद व्यवस्थित नाही. कामावर नियंत्रण नसून, समन्वयाचाही अभाव आहे.

अनूप अग्रवाल यांनी दिली कागदपत्रे
पाणीपुरवठायोजनेत कशा पद्धतीने चुकीचे कामे करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या सर्व कामांची तपासणी शंभर टक्के बरोबर असल्याचा शेरा देऊन तत्कालीन अभियंता पी.आर.दरेवार यांनी साडेसात कोटी रुपयांचे बिले काढले. हाताने बिले लिहिली आहे. त्याचप्रमाणे मोजमापाची चुकीच्या पद्धतीने नोंद केली आहे. तर पीएमसी तत्कालीन आयुक्त के. व्ही. धनाड यांनी लेखी दिल्याची सर्व कागदपत्र अनूप अग्रवाल यांनी अभियंता मनीषा पलांडे यांना देऊन अभियंता दरेवार यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.

ठेकेदार प्रतिनिधीची केली कानउघाडणी
कामाच्यापाहणीसाठी समिती येणार आहे. पाइपलाइन कामाची काही ठिकाणी खोदून पाहणी करणार असल्याने त्यानुसार खड्डे खोदण्यासाठी माणसे यंत्रणा तयार पाहिजे होती; परंतु अगोदरच काही खड्डे खोदून ठेवले तर समितीने ऐनवेळी दुसरे खड्डे खोदण्यास सांगितल्यावर ठेकेदाराकडे माणसे नव्हती. त्यामुळे समितीने ठेकेदाराच्या प्रतिनिधीला चांगलेच फटकारले. खड्डा खोदण्यासाठी केवळ तासाभराचा वेळ पुरेसा असताना ठेकेदाराने उद्यापर्यंत खड्डा खोदतो, असे सांगितल्यामुळे समितीच्या सदस्यांचा संताप झाला. तासाभरात खड्डा खोदलाच पाहिजे, असे आदेश समितीने या वेळी दिले होते.

- चक्करबर्डीवरील मुख्य जलकुंभाचे फुटिंग कामही तांत्रिकदृष्ट्या अयोग्य असल्याचे केली पाहणी.
- शांतिनाथ नगरातही जलकुंभाच्या कामाची पाहणी केल्यानंतर त्रुटी आल्या लक्षात.
- महामार्गाकडील श्रीराजनगरातील पाइपलाइनच्या पाहणीप्रसंगी नकाशाचीही केली तपासणी.
- मनपाच्या तांत्रिक सल्लागार समितीला नकाशावर प्रत्यक्षात काम दाखवता आले नाही.
- पाइपलाइनचे काम दोन फूट आढळून आले नाही. त्यामुळे सदस्यांनी नाराजी वर्तविली.
- अस्ताव्यस्त पाइप साहित्य पडलेले पाहून ठेकेदाराच्या प्रतिनिधींना समितीने घेतले फैलावर.
- देवपूरमध्ये सर्वाधिक काम झाले आहे. तेथीलच कामाची पाहणी करायला समितीने दिले प्राधान्य.
- प्रत्यक्ष नागरिकांशी चर्चा केल्यानंतर तांत्रिक सल्लागार समितीवरही प्रश्नांच्या झाडल्या फैरी.
- तांत्रिकदृष्ट्या काम सदोष असल्याचे दिसून आल्यानंतर समितीने सखोल पाहणीला केली सुरुवात.
- मुख्यमंत्र्यांनी समिती नियुक्ती करायला लावल्यामुळे गंभीरपणे होतेय पाणी योजनेच्या कामाची पाहणी. अहवालानंतर कार्यवाही.

श्रीरंग कॉलनीतील त्या पाइपलाइनची केली पाहणी
दत्तमंदिर भागातील श्रीरंग काॅलनीतील कामाची अनूप अग्रवाल यांनी तक्रार केली होती. त्याच पाइपलाइनची पाहणी करण्याची मागणी केल्याप्रमाणे दोन ठिकाणी ती खोदण्यात आल्यावर त्यातील तफावत दिसून आली. येथे केवळ दीड फूट खोल पाइपलाइन होती. त्याचप्रमाणे नोंदीत ९० एमएम व्यासाची तर प्रत्यक्षात १६० एमएमची पाइपलाइन आढळली.