आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेल्हाळय़ात जलशुद्धीकरण यंत्रणेसाठी हालचाली सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - प्रजासत्ताक दिनी वेल्हाळे ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले होते. त्यावेळी महानिर्मितीच्या अधिकार्‍यांनी पाच मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले होते. त्यानुसार गावासाठी जलशुद्धीकरण यंत्रणेसह पाणीपुरवठा योजना तयार करण्यासाठी दीपनगरच्या अधिकार्‍यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. आता प्रत्यक्ष निर्णयाच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा आहे. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने सातत्याने पाठपुरावा केला आहे.

वेल्हाळे (ता. भुसावळ) ग्रामस्थांनी 26 जानेवारीला वेल्हाळे अँश बंड क्रमांक तीनमध्ये विविध मागण्यांसाठी जलसमाधी आंदोलन उभारले होते. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आणि जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र साहेबराव चौधरी यांनी मध्यस्थी करून, पाच आश्वासनांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दीपनगरातील तत्कालीन मुख्याधिकारी मनोहर गोडवे यांच्याकडून घेतले होते. वेल्हाळे तलावातील राखेचा उपसा करण्यासह गावाला शुद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आश्वासनाचा यात उल्लेख होता. सध्या वेल्हाळे तलावात पाण्याची पातळी अधिक असल्याने राखेचा उपसा होणे कठीण आहे. मात्र, गावाच्या शुद्ध पाणीपुरवठय़ाकडेही दीपनगर केंद्रातील अधिकार्‍यांचे दुर्लक्ष झाले होते. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने सातत्याने पाठपुरावा केला. दरम्यान आता शुद्ध पाण्यासाठी ‘आरओ प्लांट’ आणि दररोज एक लाख लीटर शुद्ध पाणी ग्रामस्थांना मिळेल, अशा क्षमतेचा प्रकल्प उभारून देण्यासाठी दीपनगर प्रशासन अनुकूल आहे. येत्या आठवडाभरात यासंदर्भात स्पॉट व्हिजिट करून निविदा काढली जाणार आहे. कमी मेन्टनन्स असलेला प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात पुढील कार्यवाही होणार आहे.

रस्ते दुरुस्तीचा प्रयत्न
दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राच्या प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांप्रमाणे जलशुद्धीकरण केंद्रासह पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी आता लक्ष घातले आहे. या मुळे वेल्हाळे ग्रामस्थांची अशुद्ध पाण्याच्या त्रासातून सुटका होईल. काही दिवसातच राखेमुळे खराब झालेले रस्तेदेखील दुरूस्त करण्यावर भर असेल. राजेंद्र साहेबराव चौधरी, सदस्य, जिल्हा परिषद, फुलगाव

कागदपत्रांची पूर्तता करणेही महत्त्वाचे
प्रकल्प बाधितांसाठी महानिर्मिती प्रशासनाकडून सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असतो. वेल्हाळे गावासाठी दिलेल्या आश्वासनांप्रमाणे कामे करून दिले जातील. यासाठी संबंधित ग्रामपंचायतीनेही आवश्यक त्या कागदपत्रांचा पुरवठा करावा, या मुळे प्रशासकीय कामात गतिमानता येईल. एल. बी. चौधरी, उपमुख्य अभियंता, वीजनिर्मिती प्रकल्प, दीपनगर