आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाय योजना: स्वच्छ पाण्यासाठी पालिका प्रशासनाची धडपड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मेहरूण परिसरात साकेगाव येथून एमआयडीसीमार्फत होणारा पाणीपुरवठा दूषित होत असल्यामुळे प्रशासनातर्फे उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसार गुरुवारी एमआयडीसीतील दोनपैकी एका जलकुंभाची सफाई करण्यात येऊन त्यात साचलेला गाळ काढण्यात आला. तसेच दुसर्‍या जलकुंभाचे काम शनिवारपूर्वी करण्यात येणार आहे.

मेहरूण व हरिविठ्ठलनगर परिसरात दूषित पाणीपुरवठा झाल्यानंतर एमआयडीसीचे अधिकारी जागे झाले आहेत. औद्योगिक परिसर व महापालिकेला पाणीपुरवठा करण्यासाठी एमआयडीसीत दोन जलकुंभ आहेत. शनिवारी बहुतांश कंपन्या बंद असल्याने त्या दिवशी सफाईचे काम केले जाते; मात्र महापालिका हद्दीत दिल्या जाणार्‍या पाण्यात किडे आढळून आल्यानंतर गुरुवारी दुपारच्या वेळी लहान जलकुंभाची साफसफाई केली. काव्यरत्नावली चौकातील पाइपलाइनवर असलेला व्हॉल्व्ह नादुरुस्त झाला होता. गुरुवारी सकाळी त्याची दुरुस्ती केल्याचे कनिष्ठ अभियंता संजय नेमाडे यांनी सांगितले.

पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचा प्रयत्न
पावसाळ्यात पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा म्हणून पालिकेतर्फे शहरातील सर्वच नालेसफाईच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. शहरात प्रमुख पाच व 12 उप असे एकूण 17 नाले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी तातडीने त्यांची सफाई करण्याचे आदेश प्रभारी आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी दिले आहेत. मेहरूण तलावापासून ममुराबाद शिवारापर्यंत जाणारा चार किलोमीटर लांबीचा लेंडी नाला शहरातील प्रमुख नाला आहे. पावसाळ्याला साधारणत: जूनच्या अखेरीस सुरुवात होत असल्याचा अनुभव लक्षात घेऊन आयुक्तांनी आतापासूनच सफाईला सुरुवात करण्याचे आदेश दिले आहेत. पालिकेकडे सद्य:स्थितीत आरोग्य, पाणीपुरवठा व बांधकाम विभागाचा प्रत्येकी एक जेसीबी आहे. शहरातील नालेसफाईचे काम पालिकेच्या यंत्रणेवर करणे शक्य नसल्याने खासगी जेसीबीची मदत घेण्याची मुभा देण्यात आली आहे. यासंदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार प्रभाग अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.

आता नियमित सफाई करणार
पाण्याच्या गुणवत्तेबाबत तक्रारी वाढल्याने आता आठवड्यातून एकदा हे काम करण्यात येणार आहे. हतनूर धरणावरून महिनाभरापूर्वीच आवर्तन मिळाल्याने पुन्हा आवर्तन मिळणे कठीण आहे.
-जे. पी. पवार, उपअभियंता, एमआयडीसी