आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टंचाई अाराखड्यामध्ये २६ गावे, ८२ लाखांच्या कामांचे नियाेजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - पाणीटंचाई निवारणाच्या उद्देशाने येथील पंचायत समितीत स्वतंत्र कक्ष स्थापन झाला अाहे. त्यात पाणीपुरवठा अभियंता एस.पी. लाेखंडे यांची नियुक्ती झाली अाहे. तालुक्याच्या संभाव्य टंचाई कृती अाराखड्यात यंदा तब्बल २६ गावांचा समावेश अाहे. प्रशासनाने दरराेज टंचाईचा अाढावा देणे बंधनकारक केले अाहे.
शहरासह तालुक्यात दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा चाैथ्या अाठवड्यात पाणीटंचाई भेडसावते. मात्र, यंदा एप्रिलपासूनच टंचाईच्या झळा तीव्र झाल्याने प्रशासनाने तातडीच्या उपाययाेजना करण्यावर भर दिला अाहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अादेशाने तालुकास्तरीय टंचाई निवारण कक्ष स्थापन करण्यात अाला अाहे. त्यात पाणीपुरवठा विभागाचे अभियंता त्यांना मदतीसाठी दाेन स्थापत्य अभियंता सहाय्यक, एक कनिष्ठ सहायक एक शिपाई अशा पाच जणांची नियुक्ती करण्यात अाली अाहे.

टंचाई कक्षाच्या माध्यमातून अामदार संजय सावकारे, प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे, तहसीलदार हरीष भामरे, सभापती राजेंद्र चाैधरी, गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता हे वेळाेवेळी अाढावा घेत अाहेत. शाखा अभियंता लाेखंडे हे दैनंदिन अाढावा घेऊन वरिष्ठ पातळीवर सादर करीत अाहेत. विस्तारित भागात टॅकरने पाणीपुरवठ्याची मागणी सातत्याने जाेर धरू लागली अाहे.

भीलमळीत दाेन किलाेमीटर भटकंती : मांडवेदिगर,भीलमळी येथील पाणीपुरवठ्याच्या विहिरी अाटल्याने नागरिकांना दीड ते दाेन किलाेमीटरवरील जलस्त्राेतांवरून पायपीट करून पाणी अाणावे लागत अाहे. भुसावळच्या खडका ग्रामपंचायत हद्दीतील मुस्लिम काॅलनी, साकेगाव हद्दीतील श्रीनगर, जळगाव राेडवरील ग्लाेबल हाॅस्पिटलसमाेरच्या विस्तारित भागातही टंचाईची तीव्रता अधिक अाहे. गणेश काॅलनी भागातील कुपनलिका अाटल्याने गेल्या अाठवड्यापासून येथील रहिवाशांनाही यंदा टंचाईचा ताेंड द्यावे लागत अाहे.

साकरी फाटा परिसरात तीव्रता अधिक : भुसावळशहरानजीकच्या कंडारी ग्रामपंचायत हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर वरणगावकडे जाताना पाच ते सहा विस्तारित काॅलन्या अाहेत. त्यात पद्मावतीनगर, लाल जैन मंदिर परिसर, गाेलाणी काॅम्प्लेक्स, साकरी फाटा, सिद्धिविनायक काॅलनी, सहकारी अाैद्याेगिक वसाहतीचा समावेश अाहे. साधारणपणे या भागाची तीन ते चार हजार लाेकवस्ती अाहे. मात्र, रेल्वेलाइनमुळे कंडारी ग्रामपंचायतीने या भागात स्वतंत्र पाणीपुरवठ्याची व्यवस्था केलेली नसल्याचे रहिवाशांची गैरसाेय हाेते.

तापी पात्रातील बंधारा तुडुंब
हतनूर धरणाचे अावर्तन तीन दिवसांपूर्वी तापी नदीपात्रातील बंधाऱ्यात पाेहाेचल्याते ताे तुडुंब भरला अाहे. त्यामुळे शहरावरील पाणीटंचाईचे संकट निवळले अाहे. मात्र, विस्तारित काॅलनी भागात कमी दाबाने पाणीपुरवठा हाेत अाहे. सार्वजनिक विहिरींची साफसफाई करण्याचे काम अाता अंतिम टप्प्यात पाेहाेचले अाहे.

^कंडारी ग्रामपंचायतहद्दीतील गाेलाणी साकरी फाटा या भागात दाेन कुपनलिका अधिग्रहीत करण्यात येणार अाहे. या संदर्भात पाठपुरावा करण्यात अाला असून ताे अंतिम टप्प्यात अाहे. स्टॅडपाेस्ट उभारणी करून या भागातील रहिवाशांना पाणीपुरवठा केला जाईल. याेगिता शिंगारे, सरपंच,ग्रामपंचायत कंडारी, ता.भुसावळ

^टंचाईवर मातकरण्यासाठी उपाययाेजना केल्या जात अाहेत. कंडारी ग्रामपंचायत हद्दीत साकरी फाटा भागात खासगी कूपनलिका अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव अाहे. अद्यापपर्यंत तालुक्यात एकाही ठिकाणी टँकर सुरू करण्यात अालेले नाही. राजेंद्र चाैधरी, सभापती,पंचायत समिती, भुसावळ

^ग्रामपंचायतींकडून टंचाईचाप्रस्ताव येताच ताे वरिष्ठांकडे तत्काळ सादर करून मंजुरी मिळवण्याचा प्रयत्न अाहे. भुसावळ ग्रामीणमध्ये टँकरची मागणी हाेत असली, तरी जिल्हा प्रशासनाकडून तशा अाशयाचा निर्णय अजूनपर्यंत झालेला नाही. एस. पी. लाेखंडे, पाणीपुरवठाअभियंता, पंचायत समिती, भुसावळ

१७ गावांना ३१ विंधन विहिरी
टंचाई कृती अाराखड्यानुसार कंडारी, भानखेडा, टहाकळी, फुलगाव, पिंप्रीसेकम, निंभाेरा बुद्रूक, साकरी, जाडगाव, मन्यारखेडा, खडका, कन्हाळे बुद्रूक, वझरखेडा, साकेगाव, फेकरी, भुसावळ ग्रामीण, कुऱ्हे, हतनूर अशा १७ गावांना ३१ विंधन विहिरी प्रस्तावित अाहेत. त्यापैकी १३ विंधन विहिरींची कामे पूर्ण झाली अाहेत.

खासगी विहिरींचे अधिग्रहण
टंचाई कृती अाराखड्यात तालुक्यातील २६ गावांचा समावेश अाहे. विहिरी खाेल करणे, शेवडी खाेदणे, खासगी विहीर, कूपनलिका अधिग्रहण, नवीन विंधन विहीर, तात्पुरती पाणीपुरवठा याेजना या कामांसाठी ८२ लाख ४० हजार रुपये खर्च प्रस्तावित अाहे.