आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलशुद्धीकरण यंत्रणा ठप्प, शहरात गाळमिश्रित पाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील क्लोरिफाॅक्युरेटर ही पाण्यातील गाळ बाजूला सारण्याची यंत्रणा ठप्प झाली आहे. त्यातच अॅलमचा साठा नसल्याने जलशुद्धीकरणाची प्रक्रियाच पूर्ण होत नसल्याची स्थिती आहे. परिणामी गेल्या दोन दिवसांपासून पिवळ्या रंगाचा गाळमिश्रित पाणीपुरवठा हाेत अाहे.
तापी नदीपात्रातील बंधाऱ्याची उंची वाढवूनही मे महिन्यात प्रचंड टंचाई निर्माण झाली होती. गेल्या आठवड्यात हतनूरमधून पाणी मिळाल्याने शहरात पाणीटंचाईचा प्रश्न निवळला. मात्र, हा प्रश्न सुटत नाही तोच अाता अशुद्ध, गढूळ गाळमिश्रित पाणीपुरवठ्याने डोके वर काढले आहे. जलशुद्धीकरण यंत्रणेवरील क्लोरिफाॅक्युरेटर हे तर दोन वर्षांपासून बंद आहे. गेल्या महिन्यांपर्यंत ते किंचित काम करीत होते. अाता ही यंत्रणाच ठप्प असल्याने नदीपात्रातून उचललेल्या रॉ-वॉटरमधून माती गाळ बाजूला सारण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही. परिणामी गाळमिश्रित पाणीपुरवठा होत आहे. जलशुद्धीकरण केंद्रात अॅलमचा साठा संपला आहे. यामुळे अॅलमची प्रक्रिया होतच नाही. पाण्यात अॅलम मिसळल्यानंतर पाण्यातील गाळ तळाशी साठतो. अॅलम शिल्लक नसल्याने फक्त क्लोरिन प्रक्रिया करून पाणीपुरवठा केला जात आहे. क्लोरिफाॅक्युरेटर ब्रीच ही यंत्रणाच सध्या काम करीत नाही, हे विशेष.

सँड फिल्टरची अवस्था बिकट
जलशुद्धीकरण केंद्रात सँड फिल्टर ही यंत्रणा महत्त्वाची मानली जाते. मात्र, ही यंत्रणा बंद आहे. सँड फिल्टरमध्ये वापरण्यात येणारी वाळू ४० वर्षांनंतरही बदलली गेली नाही. सँडच्या खालील भागात असलेली हिंदुस्तान कंपनीची विशिष्ट धातूची जाळी जीर्ण झाली अाहे. यामुळे सँड फिल्टर कामच करीत नाही. उर्वरित काही प्रमाणात काम करणाऱ्या फिल्टरची वेळोवेळी स्वच्छता होत नाही.

जलशुद्धीकरण यंत्रणा२५ वर्षांपूर्वीच कालबाह्य झाली आहे. गतकाळात नवीन योजनेसाठी व्यापक प्रयत्न झाले नाहीत. आमच्या कार्यकाळात अमृत योजना मंजूर केली आहे. लवकरच निधी मिळून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू होईल. अॅलमची खरेदी केली जाईल. अख्तर पिंजारी, नगराध्यक्ष,भुसावळ

जलक्रांती आंदोलनकरून क्लोरिफाॅक्युरेटरमधील गाळ काढण्यासाठी नगरपालिकेला प्रवृत्त केल्याने पाणीपुरवठा समाधानकारक होता. यानंतर पालिकेने गांभीर्याने लक्ष पुरवले नाही. म्हणून या संदर्भात पुन्हा आंदोलन उभारावे लागले, अशी स्थिती दिसून येत अाहे. डाॅ. नी. तु. पाटील, गणेशकॉलनी, जळगाव रोड, भुसावळ

निविदेला लागला ब्रेक
पावसाळ्यात जलशुद्धीकरण केंद्रात दररोज १० टन अॅलमची गरज भासते. पावसाळा तोंडावर आला असताना पालिकेकडे अॅलम नाही. याबाबत ई-निविदा मंजूर झाली आहे. मात्र, अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही. पहिल्याच पुरानंतर अशुद्ध पाणीपुरवठ्याचे प्रमाण वाढेल. आठवडाभरात पालिका प्रशासनाने ठोस निर्णय घेेणे नितांत गरजेचे अाहे.
रोटेशन तब्बल चार तासांनी पुढे लाेटले
भुसावळ जलशुद्धीकरणकेंद्रातून निघणाऱ्या आऊललेट वेस्ट वॉटर यंत्रणेवरील तापीनगरातील चेंबर चोकअप झाले आहे. पालिकेने बुधवारी दुरुस्तीचे काम हाती घेतले असले, तरी रोटेशन चार तासांनी पुढे लाेटले गेले अाहे.
जलशुद्धीकरण केंद्रातून प्रक्रिया झाल्यानंतर गाळमिश्रित अाणि फिल्टरचे वेस्ट वॉटर चंेबरद्वारे पुन्हा नदीपात्रात सोडले जाते. यासाठी सन १९५८मध्ये जलशुद्धीकरण केंद्रापासून थेट नदीपर्यंत भूमिगत आऊटलेट यंत्रणा उभारण्यात आली आहे. या यंत्रणेवर चार ठिकाणी चेंबर आहेत. गेल्या दोन दिवसांपासून तापीनगरात ही यंत्रणा चोकअप झाल्याने पाणीपुरवठा यंत्रणेवरील फिल्टरेशनची प्रक्रिया मंदगतीने झाली. चोकअपचे प्रमाण वाढले असते, तर यंत्रणा ठप्प होण्याचाही धोका होता. यामुळे पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे जलदाय अभियंता विपुल साळुंके कर्मचाऱ्यांनी बुधवारी या चेंबर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात अाले. गुरुवारी दुपारपर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे. दुरुस्तीनंतर पाणी फिल्टरेशनची प्रक्रिया लवकर होऊन वेळेवर पाणी मिळण्यास मदत हाेईल.
बातम्या आणखी आहेत...