आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी याेजना धूळ खात; तरीही नव्याने अाणले हजाराे पाइप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - पाणीपुरवठा याेजना पुरती धूळ खात पडली अाहे. नवरंग जलकुंभानजीक प्लास्टिकच्या जुन्या पाइपांचे शेकडाे वेटाेळे पडलेले अाहेत. पाच ते सात किलाेमीटरचे हे पाइप उन्हात खराब हाेत असताना अाता पुन्हा नव्याने लाेखंडी जीअाय पाइप अाणण्यात येत अाहेत. शनिवारी चार ट्रकांमधून अालेले हे पाइप उतरवून घेण्यात अाले. मात्र मेअखेरपर्यंतही याेजनेच्या कामाला सुरुवात हाेणार नाही, असे चित्र अाहे. त्यामुळे केवळ पाइप अाणून त्यावर लाखाे रुपयांचा खर्च केला जात अाहे.
महापालिकेची १३६ काेटी रुपयांची याेजना जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटला. या कालावधीत योजनेचे कागदपत्र, करारानामे, स्वाक्षरी, बैठका झाल्या आहेत. तर आता यापूर्वी ठेकेदाराने केलेल्या कामांचे मोजमाप करण्याच्या सूचना दिल्याप्रमाणे काम सुरू आहे. यापूर्वी ठेेकेदाराने १२५ ते १५० फूट नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम केले. त्याचबराेबर ठेकेदाराने कामासाठी मोठ्या प्रमाणात व्हॉल्व्ह, प्लास्टिक पाइप इतर साहित्य आणून ठेवले आहे. ते शहरात विविध ठिकाणी मोकळ्या जागांवर पडून आहेत. त्याची कोणत्याही प्रकारे काळजी घेण्यात येत नसून, उघड्यावर हे साहित्य पडून आहे. तर आता त्यात अजून नवीन पाइपांची भर पडली अाहे. नवरंग जलकुंभाच्या मोकळ्या जागेवर नवीन लोखंडी पाइप अाणले जात आहे. हे पाइप मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. या जलवाहिनीवरून पाणीपुरवठा होणार अाहे. त्यानंतर उपजलवाहिन्या कॉलनीमध्ये टाकण्यात आलेल्या प्लास्टिक पाइपलाइनमधून पाणीपुरवठा होईल. त्यासाठी हे पाइप आणणे सुरू झाले आहे. मात्र, अजून कामाला सुरुवात झालेली नाही. मात्र त्यापूर्वी साहित्य आणले जात आहे.

मे मध्ये कामाची शक्यता
मनपाची पाणीपुरवठा योजना मजीप्राकडे हस्तांतर करण्यात आली आहे. त्यामुळे काम सुरू होणे अपेक्षित हाेते; परंतु अद्यापपर्यंत काम सुरू झालेले नाही. मजीप्रातर्फे योजनेचे कागदपत्र, करारनामे करण्यात आले आहे. मात्र अजूनही काही तांत्रिक बाबी पूर्ण होणे बाकी आहे. त्यामुळे मे महिन्यानंतरच कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र त्याबाबतही चित्र स्पष्ट झालेले नाही. त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

जलकुंभाच्या कामासाठी प्रत्यक्ष जागेचा ताबा
शहरात जलकुंभ बांधावे लागतील. मात्र, केवळ चक्करबर्डी येथे काम सुरू झाले. त्यानंतर शांतिनाथ नगर येथे जलकुंभ बांधावयाचा आहे. त्यासाठी मजीप्राने या जागांचा ठराव, सातबाऱ्याची मागणी केली होती. तर आता या जागा मनपाने मजीप्राच्या प्रत्यक्ष ताब्यात दिल्याशिवाय काम सुरू करता येणार नाही, अशी भूमिका मजीप्राची आहे.

कामाचे मोजमाप सुरू
योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील काम सुरू करण्यापूर्वी आतापर्यंत झालेल्या कामाचे मोजमाप करण्याच्या सूचना मजीप्राच्या मुख्य अधिकाऱ्यांनी केल्यानुसार मोजमाप करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मोजमाप करताना त्या जागेवर खोदकाम करून त्याची तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी मे महिन्याचा कालावधी लागू शकतो.