आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिरणा, बहुळा, हिवरातून आवर्तन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोरा/चाळीसगाव - चाळीसगावसह पाचोरा व भडगाव तालुक्यात रब्बीसाठी आवर्तन मिळाल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पाचोरा तालुक्यासाठी शनिवारी सायंकाळी हिवरा व बहुळा प्रकल्पातून आवर्तन सोडण्यात आले तर गिरणा धरणातून सोमवारी सकाळी सहा वाजता दोन हजार क्यूसेस पाणी सोडण्यात येणार होते. शेती काठावरील गावांना सिंचनाशिवाय पिण्याचे पाणी मिळेल. गिरणावर असलेल्या विहिरी व के.टी.वेअरला पाणी मिळणार असल्याने तिन्ही शहरांमध्ये पाण्याच्या दिवसातील अंतर कमी होईल. आवर्तनाचा प्रवाह पाहता गिरणाकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

संपूर्ण पाचोरा तालुक्यात फायदा
पाचोरा तालुक्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. हिवरा, बहुळा, अग्नावती, कोल्हे हे प्रकल्प तुडुंब भरले. हिवरा व बहुळातून रब्बी हंगामासाठी पाण्याचे पहिले आवर्तन सोडल्याने परिसरातील सुमारे साडेपाच हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. याशिवाय गिरणातूनही आवर्तन सुटणार असल्याने पाचोरा तालुक्याला पाण्याचा दुहेरी फायदा होईल. गिरणावर अवलंबून असलेल्या गावांनाही आवर्तनाचा फायदा मिळणार असल्याने रब्बीचे उत्पादन वाढेल. आवर्तन सोडण्यापूर्वी पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी पाटबंधारे विभागाने मक्तेदारांकडून पाटचार्‍यांची देखभाल दुरुस्तीची कामे करून घेतली. ज्वारी, मका, गहू, हरबरा, दादर या पिकांची मोठय़ा प्रमाणात पेरणी करण्यात आली आहे. शेतात पाणी मिळाले म्हणून बहुळा हिवराच्या पाटचार्‍यांची साफसफाई करून हिवराच्या डाव्या कालव्याद्वारे खडकदेवळा ते अंतुलीपर्यंत तर उजव्या कालव्यातून खडकदेवळा, वाघुलखेडा, सारोळा, कृष्णापूर शिवारासाठी 30 क्यूसेस पाणी सोडण्यात आले. हिवरा क्षेत्राखालील 300 हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. बहुळा मध्यम प्रकल्पातील उजव्या कालव्याद्वारे 50 क्युसेस पाण्याचे पहिले आवर्तन सोडून वेरूळी, खेडगाव हडसन, नांद्रापर्यंत 250 हेक्टरला पाणी मिळाले. बहुळाचे दुसरे आवर्तन जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तर हिवराचे दुसरे आवर्तन मागणीनुसार सोडण्यात येईल.

दोन हजार क्यूसेस पाणी
गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बी.एस.खातेपुरी यांच्या आदेशाने गिरणा धरणातून आज सोमवार,दि.30 रोजी सकाळी सहा वाजता दोन हजार क्यूसेस पाणी सोडण्यात आले. पाणी सिंचनासाठी आरक्षित असले तरी त्यामुळे गिरणा काठावरील विहिरी भरणार आहेत.

पाणीपुरवठा सुरळीत होईल
भडगाव व चाळीसगाव शहरात सहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. दोन्ही शहराच्या पाणीपुरवठा योजना गिरणावर अवलंबून असून आवर्तन सुटले असल्याने गिरणा पंपिंगवरील विहिरींच्या जलसाठय़ात वाढ होणार आहे. किमान चार दिवसांनी पाणीपुरवठा व्हावा.

पाण्याचे आरक्षण वाढले
गेल्या वर्षी अतिशय कमी पाऊस झाल्याने तालुक्यात पिण्याचे पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे यावर्षी प्रत्येक प्रकल्पात पाण्याचे आरक्षण वाढविण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. पाण्याचे तिसरे आवर्तन 23 फेब्रुवारीपर्यंत सोडण्यात येणार आहे.

वसुली कर्मचारी नाही
हिवरा व बहुळाच्या पाण्याचे पहिले आवर्तन डिसेंबर महिन्यात सोडण्यात आले. मात्र पैसे वसूल करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे पुरेसे कर्मचारी नसल्याने वसुली ठप्प झाली आहे. पाणी मागणी अर्जाद्वारे सध्या शेतकर्‍यांकडून वसुलीचे काम सुरू आहे.