आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसांनी होणार सुरळीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मुख्य जलवाहिनीला यल्लमा माता मंदिराजवळ मंगळवारपासून गळती लागली आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पालिकेतर्फे युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. मात्र, शहरातील पाणीपुरवठय़ावर मोठा परिणाम झाला आहे.

विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त जलवाहिनीद्वारे पुरवठा सुरू करण्यात आला असून शनिवारी जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण होणार असल्याची शक्यता आहे. त्यानंतर दोन दिवसांनी रोटेशननुसार पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकेल. पालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेतील रॉ-वॉटर केंद्रापासून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत दोन जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. मात्र, 1958 मध्ये टाकण्यात आलेल्या दोन्ही जलवाहिन्या जीर्ण झाल्याने वारंवार त्या फु टण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे शहरवासीयांना वारंवार पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते. जलवाहिनीला लागणार्‍या गळतीमुळे काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

मंगळवारी रात्री यल्लमा माता मंदिराजवळ ही जलवाहिनी पाण्याच्या अतिदाबाने फुटली. त्यामुळे शहरात अतिरिक्त जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र, जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठय़ात 30 टक्के कपात करण्यात आली आहे. दुसरीकडे जलवाहिनी दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण करून शनिवारपर्यंत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.

  • तीन दिवसांपासून 30 टक्के कपात
  • पाणीपुरवठा विस्कळीत
  • जलवाहिनी फुटली
  • शनिवारी होणार दुरुस्तीचे काम पूर्ण
  • हिवाळ्यातही करावी लागतेय पाण्यासाठी भटकंती


12 कोटींचा निधी
राज्य सरकारने भुसावळ पालिकेसाठी नगरोत्थान योजनेतून नुकताच 12 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी लवकर प्राप्त झाल्यास 1958 पासून टाकलेली जीर्ण जलवाहिनी बदलवण्याचे काम सुरू करता येईल. त्यानंतर हा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागण्यास मदत होईल.

जलवाहिनी 18 इंच व्यासाची
साडेपाच दशकांपूर्वी टाकण्यात आलेल्या जलवाहिनीचा व्यास 18 इंच आहे. त्यामुळे जलवाहिनीला गळती लागल्यास दुरुस्तीसाठी मोठा खड्डा खोदावा लागतो. तसेच जलवाहिनीला वेल्डिंग करण्यासाठी वर्कशॉपवर नेण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने दुरुस्तीला अधिक वेळ लागतो.

दरडोई 90 लीटर पाणीपुरवठा
अतिरिक्त जलवाहिनीद्वारे शहरवासीयांना दिवसाकाठी दरडोई 90 लीटर पाण्याचा पुरवठा सुरू आहे. काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने दहा टक्के नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.

शनिवारी होणार काम पूर्ण
जलवाहिनीची गळती दुरूस्त करण्याच्या कामास गती देण्यात आली आहे. जलवाहिनी जीर्ण झाल्याने दुरुस्ती करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. शनिवारपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ए. बी. चौधरी, पाणीपुरवठा अभियंता, नगरपालिका, भुसावळ