आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दररोज पाण्यासाठी चार जलशुद्धीकरण केंद्रांची आवश्यकता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शहराला दररोज पाणीपुरवठा होऊ शकतो, इतका जलसाठा उपलब्ध आहे. मात्र, जलशुद्धीकरण केंद्रांअभावी शहराला दररोज पाणीपुरवठा होऊ शकत नाही. यासाठी किमान चार जलशुद्धीकरण केंद्रांची आणखी आवश्यकता भासत आहे. महापालिकेने मात्र, या विषयाकडे अद्याप लक्ष दिलेले नाही. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रांसाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

शहराला नकाणे, डेडरगाव या तलावावरून प्रामुख्याने पाणीपुरवठा केला जातो. देवपूर परिसरातील नवीन वसाहतींच्या भागाला तापी पाणीपुरवठा योजनेवरून पाणी पुरविले जाते. शहराला पाणीपुरवठा करणारे हे तीन स्रोत सध्या तुडुंब भरले आहेत. त्यामुळे उन्हाळयातही पाणीपुरवठा दररोज आणि सुकर होऊ शकतो, अशी स्थिती आहे ; परंतु महापालिकेचे त्यादृष्टीने कुठलेही नियोजन नाही.

नकाणे तलावावरून होणारा पाणीपुरवठा हनुमान टेकडी जलशुद्धीकरण केंद्रावरून होतो. शहरानजीक आणि निम्म्या शहराला पाणीपुरवठा करणारे हे एकमेव जलशुद्धीकरण केंद्र आहे. तापी योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र दूर असले तरी त्याचाही समावेश शहरासाठीच केला जातो. शहराला दररोज पाणीपुरवठा करायचा असेल तर चार जलशुद्धीकरण केंद्रांची आवश्यकता आहे. डेडरगाव तलावालाही अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्र निर्माण करणे गरजेचे आहे. त्याशिवाय शहराला योग्यरीत्या आणि स्वच्छ पाणी मिळणे शक्य नाही. जलशुद्धीकरण केंद्रांची क्षमता वाढवता येत नाही. नवीन केंद्र तयार केली तर शिरपूर शहरासारखे ट्रिपल फिल्टर पाणी देता येणे शक्य होईल. महापालिकेने याबाबत विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

एक दलघफूचे केंद्र व्हावे
हनुमान टेकडी जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता निम्म्या शहराला पाणीपुरवठा करण्याइतकी असली तरी कालांतराने ती वाढविता येणार नाही. त्यामुळे आणखी चार ठिकाणी एक दलघ फुटाचे चार जलशुद्धीकरण केंद्र निर्माण झाली तर हनुमान टेकडीवरील भार कमी होऊ शकतो. त्याचबरोबर तापीच्या पाण्याचीही फारशी गरज भासणार नाही आणि भरमसाट वीजबिलाचा प्रश्नही सुटेल.