आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Water Supply News In Marathi, Water Pipe Line Issue At Jalgaon, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धूळयातील जलवाहिनी योजनेला ‘खो’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- शहराला उन्हाळय़ात जाणवणार्‍या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी योजना तयार केली होती. मात्र, शासनाने त्यात बारा गावांचा समावेश करण्याचा प्रयत्न केला तसेच निधी देण्यासही नकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे हनुमान टेकडीपर्यंत पाइपलाइन टाकण्याची योजना बारगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अक्कलपाडा धरणाचे काम पूर्णत्वास येत असून, सध्या त्यात पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे. हे पाणी कॅनॉलद्वारे नकाणे तलावात आणण्यात येत आहे. याकरिता अक्कलपाडा धरण ते हनुमान टेकडीदरम्यान पाइपलाइन टाकण्यात आल्यास शहराला एक कायमस्वरूपी पाण्याचा स्रोत उपलब्ध होणार आहे. अक्कलपाडा ते धुळे हे अंतर साधारणपणे 30 ते 35 किलोमीटर आहे. पाइपलाइनद्वारे पाणी हनुमान टेकडी जलशुद्धीकरण केंद्रात आणून शहराला पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यातून पाण्याची समस्या कायमस्वरूपी निकाली निघणार होती. त्यासाठी या योजनेचे अंदाजपत्रक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तयार करून त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. त्यावर मध्यंतरी मंत्रालयात बैठकही घेण्यात आली होती. त्यासंदर्भात मंगळवारी मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री दिलीप सोपल यांच्याकडे बैठक झाली. या वेळी महापालिका आयुक्त के. व्ही. धनाड व अधिकारी उपस्थित होते.

या योजनेवर चर्चा करताना, या योजनेत अक्कलपाडा ते धुळेदरम्यान येणार्‍या बारा गावांनाही लाभ देण्यात यावा. त्याप्रमाणे त्याची पाणीपट्टी व खर्च बारा गावांसह करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. तसेच सध्यातरी निधी उपलब्ध होणे शक्य नसल्याचेही सांगण्यात आले. महापालिकेने बारा गावांच्या या प्रस्तावास असर्मथता दर्शविली आहे. त्यामुळे शहराला आश्वासक आणि महत्त्वाकांक्षी असणार्‍या या योजनेसाठी निधी मिळण्यास अडचणी दिसत आहेत.

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नकाणे तलाव आणि तापी पाणीपुरवठा योजना हे दोन मुख्य पाण्याचे स्रोत आहेत. त्यातील नकाणे तलाव हा पूर्वीपासून शहराला पाणीपुरवठा करणारा महत्त्वाचा एकमेव स्रोत आहे. तसेच डेडरगाव तलाव आणि हरणमाळ तलावातही पाणीसाठा असतो. नकाणे तलावाच्या माध्यमातून अध्र्या शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. तर तापी पाणीपुरवठा योजनेद्वारे अध्र्या शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तापी पाणीपुरवठा योजना ही पूर्वी उन्हाळयात कोरडी असल्याने बंदच राहत होती. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठय़ाची सर्व भिस्त ही नकाणे तलावावरच होती. नकाणे तलावातील जलसाठा हा पाऊस कमी झाल्यास उन्हाळयात पाणीटंचाईचे संकट शहरावर राहत असे. त्यामुळे शहरासाठी कायमस्वरूपी पाण्याचा स्रोत असणे गरजेचे आहे. मात्र, हा स्रोत आता मिळणार नाही, असे दिसते.

नैसर्गिक उताराची स्थिती
अक्कलपाडा ते हनुमान टेकडीपर्यंत नैसर्गिक उतार असल्यामुळे वीजबिलाचा खर्च या योजनेवर येणार नव्हता. म्हणूनच ही योजना परवडणारी ठरणार होती. विरोध असताना योजनेचा प्रस्ताव गेला होता.

केंद्राच्या निधीसाठी प्रयत्नांची गरज
शहरासाठी पाणीपुरवठा योजना नव्याने करण्यासाठी केंद्र शासनाच्या यूआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत 136 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेसाठीही याच योजनेंतर्गत निधी मागण्यात येणार आहे. केंद्राची योजना असताना दुसरी योजना देता येत नाही.

57 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक
अक्कलपाडा ते हनुमान टेकडी दरम्यान पाइपलाइन टाकण्यात येऊन शहराला कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करून देण्याची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने त्यास तांत्रिक मंजुरी देऊन 57 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले होते. तेवढी रक्कम सरकारकडून मिळणार नाही.