आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात दिवसाआड पाणी, आमदारांनी आयुक्तांची पाठराखण केली तर खासदारांनी थेट तक्रार केली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरात सध्या सहा दिवसांनंतर पाणी मिळते. याच वेळी नवी योजना मात्र टाॅप टू बाॅटम तक्रारींच्या गाळात अडकलेली आहे. या योजनेची चौकशी करा तसेच नागरिकांना दररोज पाणी मिळेल याची व्यवस्था करा अशी तक्रार मागणी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

शहरासाठी पाणीसाठा असतानाही जनतेला पाच ते सहा दिवसांनंतर पाणी मिळते. त्यामुळे भविष्यासाठी ही पाणी योजना महत्त्वाची आहे. त्यामुळे चौकशीसाठी एका शासकीय समितीची नियुक्ती करावी, असे डाॅ. भामरे यांनी म्हटले आहे. या योजनेविरोधात सगळ्याच राजकीय पक्षांनी तक्रारीचा सूर आळवला आहे. भाजपही त्यात मागे नाही. गेल्या महिन्यात या योजनेतील ठेकेदाराला देण्यात येणाऱ्या बिलावरून थेट नगरसेवकांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे ही योजना पुन्हा चर्चेत आली. आयुक्तांनी बिले काढायला नको होती, असा सूर एकीकडे उमटला. त्याच वेळी आमदार अनिल गोटे यांनी आयुक्तांची बाजू घेतली. पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराविषयी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार केली. या वेळी डाॅ. भामरे म्हणाले की, यूआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत १३६ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. मात्र, जादा दराने ते ठेकेदाराला देण्यात आले. आता त्यात तक्रारी होत आहेत. चौकशीनंतरच यातील तथ्य बाहेर येईल, असेही डॉ.भामरे यांनी म्हटले आहे.

काम मात्र सुरूच...
पाणीपुरवठायोजनेच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात तक्रारी होत असतानाही पाणीपुरवठा योजनेचे काम शहरात सुरूच आहे. तसेच केवळ एकाच जलकुंभाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे एवढे होत असताना ठेकेदार घुले एकदाही महापालिकेत बोलावलेल्या आयुक्त महापौरांकडील बैठकीला उपस्थित राहिलेला नाही; परंतु प्रशासनाने गंभीरपणे त्याची दखल घेतली नाही.

केंद्राच्या योजनेची घेतली दखल
केंद्रसरकारच्या माध्यमातून सध्या पाणीपुरवठ्याची एकमेव योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या कामाची प्रथमच खासदारांनी गंभीरपणे दखल घेतली आहे. केंद्राच्या प्रतिनिधीनेही दखल घेतल्यामुळे मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारलाही दखल घ्यावी लागणार आहे. त्यामुळे चौकशी होईलच असे दिसते.

काय म्हणाले खासदार
- १३६ कोटी रुपयांची योजना १५४ कोटींवर गेली. यात भ्रष्टाचार झाला.
- कामाला सुरुवात करण्यापूर्वी १५ कोटी रुपये अॅडव्हान्स देऊन नियमाचा भंग केला.
- अंदाजपत्रकात असलेल्या नियमांना ठेकेदाराने तिलांजली दिली.
- चार फूट खोल खड्डा करता दोन फुटांवरच पाइप टाकले.
- पाइपाखाली मुरूमही टाकला नाही. तसेच पाइप बुजवले.
- जलकुंभ मेन रायझिंग लाइनपूर्वीच नळजोडणीचे पाइप टाकले.
- योजनेच्या सखोल चौकशीसाठी समिती नियुक्त करावी.

पाणीपुरवठा योजनेच्या तक्रारीत वाढ
महापालिकेच्यापाणीपुरवठा योजनेच्या कामाच्या तक्रारी सुरुवातीपासून सुरू आहेत. सातत्याने पाणीपुरवठा योजना वादाच्या भोवऱ्यात आहे. राजकीय पदाधिकारी, सत्ताधारी, विरोधक, शहराचे आमदार खासदारांनीही याबाबत तक्रार केली आहे. अशा प्रकारे टॉप टू बॉटम थेट तक्रारींची शृंखलाच आहे. मात्र, शासनही यामध्ये हस्तक्षेप करीत नाही. त्यामुळे ठेकेदारावर कुठली कारवाई होईल, अशी चिन्हे दिसत नाही. ठेकेदार योजना सोडून गेला तर असा प्रश्नही पुढे आहे.