आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुडुंब ‘मेहरूण’ची जलपातळी घटली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मेहरूण तलावाच्या सांडव्याच्या बाजूने असलेल्या दुसऱ्या प्रवाहाच्या बांधाला भगदाड पडल्याने तेथून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. याव्यतिरिक्त फ्लोटर व्हॉल्व्हमधून पाणीगळतीचे प्रमाण वाढले असून तेथूने पाणी लगतच्या स्मृती उद्यानात जात आहे. दररोज लाखो लिटर पाणी वाहून जात असल्याने तलावाची जलपातळी झपाट्याने कमी होत आहे. मनपा प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.

यंदा सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीनंतर तलावात पाण्याचा दाब वाढून उत्तरेकडील सांडव्यालगतचा मातीचा बांध फुटून गळती सुरू झाली होती. त्यातच सांडव्यालगत असलेल्या दुसऱ्या मार्गावरील बांध वाहून गेल्याने तलावाला भगदाड पडले आहे. त्यामुळे तेथूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. तेथून दररोज किमान १५ लाख लिटर पाणी वाहून जात आहे. दुसरीकडे फ्लोटर व्हॉल्व्हमधून दररोज किमान सात ते साडेसात लाख लिटर पाणी वाहून जात आहे. ‘बंधारा फोडून मेहरूण तलाव सुटला धो-धो’ या मथळ्याखाली ‘दिव्य मराठी’ने १६ सप्टेंबर रोजी चित्रमालिका दिली होती.त्यामुळे शहरात खळबळ उडाली.
पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ धाव घेत तलावाची पाहणी केली. पाण्याचा ओघ घटल्यानंतर बांध टाकण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, पाऊस थांबून आता १५ दिवसांपेक्षा अधिक काळ उलटला. तरीही दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे या ठिकाणी अजूनही मोठ्या प्रमाणावर पाणीगळती सुरूच आहे

पालिकेकडे यंत्रणाच नाही
मेहरूणतलावातून दररोज हजारो लिटर पाणी वाहून जात आहे. मात्र तलावाच्या पाणी पातळीत घट झालेली नाही, असा दावा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला .विशेष म्हणजे तलावाची साठवण क्षमता अथवा जलपातळी मोजण्यासाठी पालिकेकडे कुठलीही यंत्रणा नाही. त्यामुळे जलपातळी घटली नसल्याचा दावा कोणत्या आधारावर केला जातो, हा प्रश्न आहे.

- मेहरूण तलावाच्या बांधाची दुरुस्ती करण्यासाठी पाऊस थांबण्याची वाट पहात होतो. मुरूम मटेरीयल बांधाजवळ नेऊन तयार ठेवलेले आहे, मंगळवारी दुरुस्ती करण्यात येईल. एस.एस. भोळे, उपअभियंता,महापालिका