आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जलवाहिन्यांचे व्हॉल्व्ह ठरताहेत अपघात केंद्र; पाइप झाकण्यासाठी दगड ठेवल्याने घसरतात दुचाकीस्वार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरात पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिनीवर ठिकठिकाणी पाणी सोडण्यासाठी बसविण्यात आलेले व्हॉल्व्ह अपघाताची केंद्रे व्हायला लागली आहेत. या व्हॉल्व्हनजीक काही ठिकाणी पाइप जमिनीवर आले आहेत. तसेच ते झाकले जाऊ नये यासाठी त्यावर दगड ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनधारकांसाठी व्हॉल्व्हच्या जागा घातक ठरायला लागल्या आहेत. त्यावर योग्य पद्धतीने झाकण बसविण्याची कार्यवाही महापालिकेने करणे गरजेचे आहे.

शहरात रस्त्यांची कामे अनेकदा झाली आहेत. त्यामुळे जलवाहिनीवर असलेले व्हॉल्व्ह हे काही ठिकाणी जमीन, रस्त्याच्या खाली दाबले गेले आहेत. तर काही ठिकाणी व्हॉल्व्ह दिसावे म्हणून सिमेंट आणि लोखंडी पाइप बसविले आहेत. तर अनेक ठिकाणी व्हॉल्व्हचे ठिकाण लक्षात यावे यासाठी चक्क त्याच्या आजूबाजूला दगड रचून ठेवली आहेत. अनेक व्हॉल्व्ह हे भररस्त्यात आहेत. काही तर प्रमुख चौकात आहेत. शहरात सुमारे एका हजार व्हॉल्व्ह आहेत. त्यापैकी 40 टक्के व्हॉल्व्ह हे रस्त्यावर आहेत. अनेक ठिकाणी डांबरीकरण झाल्याने त्याखाली व्हॉल्व्ह दाबले गेले आहेत. तर काही ठिकाणी व्हॉल्व्हभोवती मोठ्या आकाराचा खड्डा तयार होऊन त्यात व्हॉल्व्हमधून होणार्‍या गळतीमुळे छोटे तळे निर्माण झाले आहे.
दरम्यान, रस्त्यावर असलेल्या या व्हॉल्व्हमुळे दररोज लहानमोठे अपघात होतात. रस्त्यावर असलेल्या व्हॉल्व्हमुळे अचानक ब्रेक लावल्याने वाहने एकमेकांवर आदळतात किंवा व्हॉल्व्हच्या खड्ड्यात वाहन गेल्याने चालकाचा तोल जाऊन ते स्लीप होते किंवा पुढील वाहनावर जाऊन आदळते. त्यातून अपघात घडतात.
एकाच व्हॉल्व्हवर आहे सिमेंटचे झाकण
नगावबारी ते पाचकंदील चौकापर्यंत चार किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या दहा ते बारा व्हॉल्व्हची प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यापैकी केवळ राजकमल चित्रमंदिराजवळील एकाच व्हॉल्व्हवर सिमेंटचे झाकण योग्य पद्धतीने बसविल्याचे आढळून आले. अन्य ठिकाणच्या व्हॉल्व्हची स्थिती फारसी चांगली नव्हती. कुठे वर पाइप तर कुठे दगडाने झाकलेले व्हॉल्व्ह आढळून आले.
75 टक्के व्हॉल्व्हमधून गळती
शहरात असलेल्या एकूण व्हॉल्व्हपैकी 70 ते 75 व्हॉल्व्हमधून पाण्याची गळती होते. गळतीतून शेकडो लिटर पाण्याची नासाडी होते. व्हॉल्व्हच्या गळतीने लाखमोलाचे पाणी थेट गटारीत जाते. त्याकडे महापालिकेला लक्ष देण्यास वेळ नाही. शहरातील संपूर्ण व्हॉल्व्हमधून गळतीमुळे महापालिकेसह शहरातील नागरिकांचेही नुकसान होते.
व्हॉल्व्हची तात्पुरती दुरुस्ती
महापालिकेकडून व्हॉल्व्हच्या दुरुस्तीकडे फारसे लक्ष दिले जात नाही. अनेकदा व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्यास त्याची तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती करण्यात येते. त्यामुळे अनेक व्हॉल्व्हची स्थिती आजही खराब आहे. अनेक व्हॉल्व्हजवळ मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला असतो. व्हॉल्व्हची दुरुस्ती योग्य पद्धतीने करून त्यावर झाकण बसविल्यास वारंवार व्हॉल्व्ह नादुरुस्त होणे, अपघातांना पायबंद बसेल.