आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसंत ऋतूत घ्या हलका आहार, प्या पुरेसे पाणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- वसंत ऋतूत वातावरणातील थंडी कमी होऊन उष्णता वाढल्याने शरीरातही बदल जाणवायला लागतात. परिणामी कफ दोषाच्या अनेक व्याधी उद्भवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी हलका आहार घेताना पाणीयुक्त रसाळ पदार्थ, फळे यांचा वापर हळूहळू वाढवणे गरजेचे आहे, असे जाणकार सांगतात. 5 फेब्रुवारीपासून वसंत ऋतूची सुरुवात झाली. या काळात वातावरणात थोडी उष्णता वाढताच झाडांना, वेलींना नवीन पालवी फुटते. नव्या पालवीमुळे सर्व सृष्टी हिरवीगार, प्रफुल्लित आणि नवचैतन्याने नटलेली भासते. निसर्गाच्या बदलांबरोबर शरीरातही बदल होतात. जंतुसंसर्ग होण्याचे प्रमाण अधिक असल्याने लहान मुले आणि वयोवृद्धांमध्ये याचा प्रभाव दिसून येतो. कफदोष, ताप, खोकला, दमा, गोवर, कांजण्या यासारख्या व्याधी डोके वर काढतात.

विषाणूंचा प्रादुर्भाव वाढेल
हवामान बदलाचा शरीरावर होणारा परिणाम लक्षात घेऊन वसंत ऋतूत पाण्याचे प्रमाण वाढवायला हवे. या काळात दम्याच्या रुग्णांचा त्रास वाढू शकतो. वयोवृद्ध आणि लहान मुलांमध्ये विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.
-डॉ. शशिकांत गाजरे, जनरल फिजिशियन

पाण्याचा वापर वाढवावा
हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाळ्यात भूक मंदावते. यावर उपाय म्हणून शरीरातील वाढती उष्णता लक्षात घेता ताक-लिंबूपाण्याचा वापर आणि पाण्याचे प्रमाण हळूहळू वाढवायला हवे. गरम पदार्थ कमी करून हलक्या पदार्थांवर भर द्यायला हवा. काकडी, रसाळ फळांचा वापर वाढला पाहिजे. - डॉ. मृदुला कुळकर्णी, आहारतज्ज्ञ, पुष्पौषधी चिकित्सक

पित्त वाढवणारा काळ
आयुर्वेदाप्रमाणे ऋतू सुरू होण्याअगोदर ऋतुसंधी असतो. या काळात ऋतूप्रमाणे शरीरातही बदल होतो. ओझ धातू शरीरात क्षीणता निर्माण करतो. त्यामुळे तिखट पदार्थ, मिठाचे प्रमाण कमी करायला हवेत. पित्त वाढवणारा काळ असल्याने पित्ताशयाचे आजार बळावतात. या काळात वमन क्रिया केल्यास शरीरातील कफ बाहेर पडतो.
-डॉ. धीरजकुमार देवरे, आयुर्वेदतज्ज्ञ

हे टाळा
0 दही, स्निग्ध पदार्थ, गोड पदार्थ, तळलेले पदार्थ टाळावेत
0 लगेच फ्रिजचे पाणी, शीतपदार्थ घेऊ नयेत
0 अति कसरती टाळाव्यात; मात्र नियमित व्यायाम आवश्यक
0 मसाल्याचे पदार्थ, मिठाचे प्रमाण कमी असावे

याचा वापर करा
0 कवठासारखे तुरट रसाचे फळ चांगले
0 कफनाशक म्हणून कडुलिंब, गूळ, आले यांची चटणी खावी
0 आले व सुंठ घालून ताक भरपूर प्यावे
0 आले, लसूण, वांगी यांचा वापर वाढवावा.
0 उकळलेले पाणी गार करून प्यावे.