आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘व्हॉट्स अ‍ॅप’ करतेय डॉक्टर-रुग्णातील अंतर कमी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- वैद्यकीय सेवा हा व्यवसाय आणि रुग्ण ग्राहक झाल्याने दोघांमधील जिव्हाळ्याचे संबंध, आपुलकीचे नातं कमी होत असल्याची ओरड नेहमीच होते. परंतु डॉक्टर व रुग्ण यांच्यातील दरी कमी होण्यास मोबाइलमधील तंत्रज्ञान उपयोगी ठरू लागले आहे. व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून शारीरिक चाचण्या आणि त्यांचे रिपोर्ट ही माहिती काही सेकंदात डॉक्टरांपर्यंत पोहचू लागली आहे. तसेच एखाद्या आजारावर डॉक्टरांच्या ग्रुपमध्ये त्यावर चर्चाही घडत आहे.
सद्याच्या युगात मोबाइल ही अत्यंत गरजेची वस्तू झाली असून व्यक्ती लहान असो की मोठी, श्रीमंत असो की गरीब कोणाच्याही हातात ती सहज बघायला मिळते. त्यामुळे मोबाइल बाळगणे आता विशेष राहिले नसले तरी मोबाइलमध्ये येणारे तंत्रज्ञान सगळ्यांसाठीच जलद घडामोडींचे केंद्र बनले आहे. गप्पा वा एखादी गोष्ट मित्रांमध्ये शेअर करणे, फोटो पाठवणे या अत्यंत किरकोळ गोष्टींसोबत मोबाइलमधील व्हॉट्स अ‍ॅपचे तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत क्रांतिकारक ठरू लागले आहे.
असा होतो उपयोग
शरीरावरील जखमा, सीटी स्कॅन, एक्स-रे, सोनोग्राफीचे रिपोर्ट डॉक्टरांना पाठवता येत असल्याने डॉक्टर कुठेही असले तरी रिपोर्ट पाहून आजाराचे निदान व उपचाराची पद्धत डॉक्टर ठरवू लागले आहेत. तसेच काही आजारांमध्ये अन्य डॉक्टांचाही सल्ला घेता येत आहे. यामुळे रुग्णांशी त्वरित संपर्क प्रस्थापित करता येत आहे.
रुग्णांसोबत नाते होतेय घट्ट
डॉक्टरांना सर्वसामान्यांमध्ये देवाचे रूप मानले जाते. परंतु गतकाळात घडलेल्या घटनांमुळे या नात्यामध्ये क टुताही निर्माण झाली होती. परंतु मोबाइल तंत्रज्ञानामुळे ती मैत्री आणखी घट्ट होताना दिसत आहे. एकदा उपचार सुरू झाल्यानंतर त्यानंतरच्या वारंवार भेटी व करायच्या चाचण्या, येणारे वैद्यकीय अहवाल यासाठी पुन: पुन्हा डॉक्टरांकडे जाण्याची गरज रुग्णांना टाळता येऊ लागली आहे. होणारा त्रास व लक्षणे याची माहिती व्हॉट्स अँपच्या माध्यमातून रिपोर्ट काही सेकंदात पाठवता येत असल्याने ताबडतोब उपचार करता येऊ लागले आहेत.
उपचाराला मदत
डॉक्टरांचेही व्हॉट्स अँपवर ग्रुप तयार झाले आहेत. रुग्णांकडे आता मोबाइल नसणे ही दुर्मीळ बाब झाली असून मोठय़ा प्रमाणात तंत्रज्ञान विकसित होत असल्याने त्याचा फायदा सगळेच घेतात. रुग्णांकडून आलेले रिपोर्ट कुठेही असलो तरी पाहून त्यावर निदान करता येणे शक्य झाले आहे. डॉक्टर बाहेर असले तरी हॉस्पिटलमधून सहज संपर्क केला जातो. यामुळे रुग्णांसोबतचे नाते आणखी दृढ होत आहे. डॉ.आर.आर.पाटील, जळगाव
डॉक्टरांचेही केलेत गट
मोबाइलमधील क्रांतीमुळे आयएमएच्या सदस्यांचाही ग्रुप झाला आहे. तसेच लहान मुलांचे डॉक्टर, सर्जन, जनरल प्रॅक्टिश्नर्स, होमिओपॅथी डॉक्टरांचे ग्रुप तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे एखाद्या विषयावर चर्चा घडवून आणली जाते. रुग्ण कुठेही असला तरी आलेल्या रिपोर्टवरून मते घेतली जातात.