आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाेर्डिंगच्या मुलांना केले वेठबिगार; जुंपले विटा,माती,वाळू उचलायला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शाळेत शिक्षणाएेवजी विटा, माती, वाळू टाेपल्यांमध्ये घेऊन वसतिगृहाचे विद्यार्थी बांधकामावर राबवण्याचा प्रकार अग्रसेन शाळेत घडला. या शाळेच्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम सध्या सुरू अाहे. याच कामावर विद्यार्थी जुंपल्याचे दिसून अाले. विद्यार्थी कामावर राबतानाची छायाचित्रे बाहेर अाली. प्रत्यक्षदर्शींनीही तसे सांगितले. समाजकल्याण विभागाने त्याची गंभीरपणे दखल घेतली. तरीही संस्थाचालक मात्र असे काही घडलेच नाही, असे सांगत कानावर हात ठेवण्याचा प्रकार करताना दिसून अाले.
शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षणापासून वंचित मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणले जात अाहे. बालमजुरीमुक्त समाज घडवण्याचे प्रयत्नही हाेत अाहेत. या उद्देशाला हरताळ फासत शहरातील श्री छत्रपती अग्रसेन शैक्षणिक संस्थेने विद्यार्थ्यांना चक्क बांधकामावर जुंपल्याचे समोर आले. अग्रसेन महाराज माध्यमिक शाळेत शिक्षण घेण्यासाठी अालेले विद्यार्थी मागासवर्गीय संस्थेच्या डॉ. राममनोहर लोहिया मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात राहतात. सध्या शाळेच्या दुसऱ्या माळ्याचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर दगड, विटा, वाळू वाहण्यासाठी चक्क विद्यार्थ्यांनाच पुढे करण्यात आले. मागील आठ दिवसांपासून विद्यार्थ्यांवर हे काम लादण्यात आले होते.

शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवत चक्क धोकेदायक काम लावणे ही बाब शासन आदेशाला छेद देणारी आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना शिक्षा करणे, शिक्षा म्हणून धोकेदायक काम लावणे आदी प्रतिबंधित करण्यात आलेले आहे. मात्र, असे असताना निव्वळ शिक्षकेतर अनुदानाची लूट करण्यासाठी विद्यार्थ्यांवर हे धोकेदायक काम लादण्यात आले. यासंदर्भात परिसरातील सुज्ञ नागरिकांनी माध्यमांशी संपर्क साधत हा धक्कादायक प्रकार समोर आणला आहे.

दरम्यान यासंदर्भात संस्थाचालकांनी घूमजाव करीत गणेशाेत्सव कालावधीत शाळेत गणपती बसवण्यासाठी दगड, वाळू, विटा आणल्या होत्या. तसेच या दगड, वाळू, विटा विद्यार्थी उचलत हाेते, असा बनाव केला आहे.

तसेच परिसरातील नागरिकांनी खोटी दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा बनावही केला आहे. मात्र या प्रकाराने परिसरातील नागरिकांनाही अाश्चर्य वाटत असल्याचे दिसून अाले.

समाज कल्याणची दखल
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने तत्काळ या प्रकरणाची गंभीर दखल घेत शाळेवर स्वतंत्र पथक पाठवत चौकशी केली आहे. शाळेतील विद्यार्थी, रेक्टर यांच्याशी चर्चा करीत परिस्थितीची पडताळणी शुक्रवारी केली.

कारवाई केली जाईल...
^वसतिगृहात विद्यार्थी शिक्षणाच्या हेतूने वास्तव्यास असतात. त्यांना कोणतेच धोकेदायक काम लावण्याचा अधिकार संस्थाचालक किंवा इतर कोणालाच नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार असलेल्यांविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. -हर्षदबडगुजर, समाजकल्याण अधिकारी,जिल्हा परिषद

हा तर बदनामीचा प्रयत्न...
^विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे धोकेदायक काम लावण्यात आलेले नाही. शाळेत गणपती बसवण्यात आला होता. त्यासाठी विद्यार्थ्यांनी दगड, वाळू, विटा आणल्या होत्या. त्या ठेवण्याचे काम गुरुवारी सुरू होते. परिसरातील नागरिकांनी दिशाभूल करणारी माहिती देत संस्थेच्या बदनामीचा प्रयत्न केला . -नंदलालअग्रवाल, संस्थाध्यक्ष, श्री अग्रसेन महाराज शैक्षणिक ट्रस्ट

जबाबदारी रेक्टरचीच
वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी रेक्टर तसेच निवासी शिक्षकांची असते. वसतिगृहात वास्तव्यास राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीविताचे रक्षण करणे रेक्टरचे कर्तव्य आहे. मात्र, असे असताना जर विद्यार्थी धोकेदायक काम करीत असतील तर त्यावर रेक्टरने मज्जाव करणे अपेक्षित आहे.
बातम्या आणखी आहेत...