आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘फुकट्या’ युजर्सचा पोलिसांना भुर्दंड!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - वायफायचा सिग्नल मिळाल्यावर बिनधास्त डाऊनलोडिंग करत बसणे, कामातून वेळ मिळाल्यावर नेट सर्फिंग करणे, त्यानंतरही वेळ उरला तर दूरध्वनीवरून बिनधास्त कोठेही फोन लावून मनसोक्त गप्पा मारणे हे चित्र महसूल, तहसील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाचे नसून, चक्क काही पोलिस ठाण्यातील आहे. त्यामुळेच पोलिस प्रशासनाचा दूरध्वनीसह इंटरनेटच्या बिलाचा आकडा वाढला आहे. त्याची दखल घेत वरिष्ठांनी आता कारवाईचे संकेत दिले आहे.
पोलिस ठाण्यातील कामे सुकर व्हावी या उद्देशाने जवळपास सर्वच पोलिस ठाणे इंटरनेटने जोडण्यात आली आहेत. पोलिस दलातील काही जण या सुविधांचा गैरवापर करतात.काही पोलिस चक्क दूरध्वनीवरून आप्तेष्टांना फोन करतात. त्याचबरोबर तास तास नेट सर्फिंग आणि हवे ते डाऊनलोड करत असल्याचे समोर आले आहे. काही महाभाग पोलिस ठाण्यातील वायफाय सुविधेचा पासवर्ड मिळवून हवे ते डाऊनलोडिंग करतात. मोबाइलची बॅटरी संपेपर्यंत मोफत सुविधेचा लाभ घेणारे कर्मचारी आता वरिष्ठांच्या नजरेत आले आहेत. मुळात कामाच्या वेळेत असले उपद‌्व्याप करणाऱ्या या कर्मचाऱ्यांमुळे पोलिस ठाण्यांचे बिल अव्वाच्या सव्वा वाढले आहे. त्यामुळे ज्या पोलिस ठाण्यांचे बिल वाढले आहे त्या पोलिस ठाण्यांना इंटरनेट-टेलिफोनचे बिल दुरुपयोगाबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक साहेबराव पाटील यांच्या सहीने पत्र पाठवण्यात आले आहे. दूरध्वनी, इंटरनेटचा केवळ कार्यालयीन कामासाठी उपयोग करावा, असे या पत्राद्वारे सूचित करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यांचे आले वाढीव बिल
अ.क्र. पोलिस ठाणे/शाखा बिल (हजारांमध्ये)
धुळे शहर पोलिस ठाणे १००२८
देवपूर पोलिस ठाणे ७५३८
मोहाडी पोलिस ठाणे ५९७२
उपविभागीय कार्यालय ५१७८
शिंदखेडा पोलिस ठाणे २६०४
जिल्हा वाचक शाखा ४७७९

कर्मचाऱ्यांकडून वसुली
दरमहायेणाऱ्या इंटरनेटच्या बिलाचे रीडिंग तपासावे, अशी सूचना पोलिस ठाण्यांना करण्यात आली आहे. त्याचबरोबर ज्या पोलिस ठाण्याचे बिल जास्त येईल त्या पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडूनच हे बिल वसूल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
पोलिस ठाण्यातील कोणत्याही वस्तूचा दुरुपयोग होऊ नये याकडे प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे. केवळ शासकीय कामापुरता दूरध्वनी इंटरनेटचा उपयोग झाला पाहिजे. या नियमाचा भंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल. साहेबरावपाटील, पोलिसअधीक्षक