आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडी नसल्याने स्वेटर्सची विक्री ‘गोठली’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा नोव्हेंबरचा मध्यान्ह आला तरीही थंडीचा मागमूस नाही. त्यामुळे उबदार कपड्यांची विक्री मंदावली आहे. शहरातील शिवतीर्थ मैदानालगत उबदार कपड्यांच्या विक्रीसाठी दोन महिन्यांपासून थाटलेल्या दुकानांवर अजूनही शुकशुकाटच आहे. नोव्हेंबरअखेर थंडीची लाट परतून उबदार कपड्यांची मागणी होईल, अशी आशा वि‍क्रेतांना आहे. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने थंडीही जोरदार राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, नोव्हेंबरचा मध्यान्ह आला तरीही अपेक्षित थंडी पडलेली नाही. दरम्यान, उपनगरे शहराबाहेरील नवीन वस्त्यांमध्ये मध्यरात्रीनंतर काही प्रमाणात वातावरण थंड आहे. मात्र, उबदार कपडे बाहेर काढण्याऐवढी थंडी अजूनही पडलेली नाही. शिवतीर्थ मैदानालगत यंदा उबदार कपडे विक्रीची 19 दुकाने महिना-दीड महिन्यापासून थाटली आहेत. मात्र, ग्राहकच फिरकत नसल्याने विक्रेत्यांची निराशा झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वेळी जास्त विक्री होईल, अशी आशा असलेल्या विक्रेत्यांनी त्या प्रमाणात मालाची खरेदीदेखील करून ठेवली होती. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे थंडीचे आगमन अजूनही झाले नसल्याने तूर्त उबदार कपडे विक्रेत्यांचा व्यवसाय थंड आहे.