आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीमुळे खुंटली केळीची वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - गेल्या महिनाभरापासून केळी बेल्टमध्ये थंडीचे प्रमाण अधिक असल्याने केळीची वाढ खुंटली आहे. यावल आणि रावेर तालुक्यातील केळीवर करप्याचा प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी उत्पन्नात 30 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे.

यावल आणि रावेर तालुक्यात तब्बल 37 हजार हेक्टर क्षेत्रावर केळीचे पिके उभी आहेत. गेल्या महिनाभरापासून 6 ते 10 अंशांदरम्यान किमान तापमान असल्याने केळीच्या वाढीवर विपरित परिणाम होत आहे. थंडीमुळे केळीची पाने पांढरी व अकार्यक्षम होत असून पानांच्या वाढीसाठी पोषक द्रव्य पुरवण्यास शेतकरी असर्मथ ठरत आहेत. पानांची वाढ खुंटणे, पोंगा करपणे, दोन पानांमधील अंतर कमी होणे, पाने आणि शिरांवर काळ्या-पिवळ्या रंगाचे ठिपके पडून करप्याची लागण होण्याची लक्षणे वाढली आहेत. केळीचे घड निसवण्याचे प्रमाणही कमी झाले असून केळीची वाढ पूर्णपणे खुंटली आहे.

घडही अडकले
केळीची वाढ खुंटल्यामुळे निसवणीस असलेले केळीचे घड अडकण्याचे प्रमाण वाढले आहे. केळीचा घड निघाला तरी त्याचे वजन कमी भरणे, वेडे-वाकडे फळ येणे असे प्रमाण वाढत आहे. अशा काळात वजन वाढीसाठी शेतकर्‍यांनी 00 : 00 : 50 या विद्राव्य खताची फवारणी करावी.