आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्रीचे तापमान 15.5 अंश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - दिवाळीनंतर आता किमान तापमानात झपाट्याने घसरण होत आहे. आठवड्याभरात किमान तापमान सरासरी साडेतीन, तर कमाल तापमान तब्बल चार अंशांनी घसरले आहे. सायंकाळी सूर्यास्तदेखील लवकर होत असून सात वाजेपासूनच हुडहुडी जाणवते. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत हे चित्र कायम राहते. दरम्यान, भुसावळ शहराचे रात्रीचे किमान तापमान 15.5 अंशांपर्यंत पोहोचले असून यात अजून घसरण होण्याची शक्यता आहे.

भौगोलिकदृष्ट्या तापीनदीच्या खोर्‍यात येणार्‍या भुसावळचे किमान तापमान कमी असायचे. सध्या मात्र दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील प्रदूषण, राष्ट्रीय महामार्गावर होणारी वृक्षतोड, चहूबाजूंनी असलेले वीटभट्टे या मुळे शहराला हॉट सिटी अशी ओळख मिळाली आहे. असे असले तरी हिवाळ्यात मात्र रेकॉर्ड ब्रेक थंडी पडते. या गुलाबी थंडीची चाहूल सध्या जाणवत आहे.

गेल्या आठवड्यात 8 नोव्हेंबरपासूनचा आढावा घेतल्यास किमान तापमानात तब्बल साडेतीन, तर कमाल तापमानात तब्बल चार अंशांनी घसरण निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात सरासरी कमाल तापमान 31 अंश, तर किमान तापमान 19 अंशांवर स्थिरावले होते. शुक्रवारी मात्र कमाल 28 आणि किमान तापमान 15.5 अंशांवर होते. गेल्या तीन दिवसांपासून थंडीचे प्रमाणही वाढले आहे.

सातपर्यंत घसरण शक्य
यंदा उशिरापर्यंत झालेल्या पावसामुळे अजूनही जमिनीत ओलावा आहे. शिवाय हतनूर धरणासह परिसरातील सर्व जलाशय तुडुंब भरलेली आहेत. या मुळे यंदाच्या हिवाळ्यात किमान तापमानाचा पारा सात अंशांपर्यंत खाली घसरण्याची चिन्हे आहेत. किमान तापमानात घसरण झाल्यास केळी पिकांच्या निसवणीवर विपरीत परिणाम होईल तर गहू आणि हरभरा या रब्बी पिकांना लाभ होईल.