आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ शहरात रेकॉर्डब्रेक थंडी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात अचानक थंडी गायब झाल्यानंतर पुन्हा थंडीचे आगमन झाले आहे. या आठवड्यात शहराचा पारा घसरला असून हुडहुडी पुन्हा वाढली आहे. यामुळे शहरातील बाजारपेठेवर परिणाम जाणवत आहे. सध्या शहरातील थंडीने रेकॉर्डब्रेक केले आहे.
उत्तर भारतात आठवड्यात झालेल्या बर्फवृष्टीमुळे देशभरातील तापमानात घसरण झाली आहे. शहराचे शनिवारचे तापमान नऊ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. शहरालगत असलेल्या वीज निर्मिती केद्रांमुळे येथे थंडीचे प्रमाण कमीच असते. मात्र, यंदा तापमानाचा पारा खाली येत आहे. कमाल आणि किमान तापामानातही मोठी तफावत निर्माण होत आहे. भुसावळचे दिवसाचे तापमान 27 अंशापर्यत पोचले आहे. सध्या तीन दिवसांपासून सकाळी थंड वारे वाहत असल्याने दिवसाच्या कमाल तापमानात घट झाली आहे. थंडीबरोबर हवेतील आद्रतेतही वाढ होत आहे. हवेत बाष्पाचे प्रमाण अधिक असल्याने दिवसाचे तापमानही कमी झाले आहे. सकाळी सात ते आठपर्यंत शहरात आणि शहरालगत तापीनदीच्या परिसरात धुके असते. यामुळे जणू एकप्रकारे लोणावळा खंडाळा येथे असल्याचा भास होत असतो. सायंकाळी सात, साडेसातनंतर थंडीचे प्रमाण वाढत असल्याने नागरिक बाजारपेठेत खरेदीसाठी जाणे टाळताना दिसून येत आहे. परिणामी रात्री दहाला बंद होणारी बाजारपेठेत रात्री 8.30 नंतर शुकशुकाट जाणवत आहे. सर्दी, खोकल्याचे रुग्णही वाढले आहेत.