आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Within Five Years See Development Fruits Aditya Thackeray

पाच वर्षांत दिसेल प्रगतीचे प्रत्यक्ष चित्र : आदित्य ठाकरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धडगाव - नंदुरबार जिल्ह्यात कुपोषण आहे, भुशा येथे तर जाण्यासाठीही रस्ता नाही. अजून खूप कामे करण्यासारखी आहेत. आमदार, खासदार जोमाने काम करीत आहेत. पाच वर्षांत प्रगतीचे प्रत्यक्ष चित्र दिसेल तेव्हा कुठेतरी अभिमान वाटेल की या महाराष्ट्रात आपण जोरदार कामे केली, असा आशावाद युवा सेनाध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी धडगाव येथे आयोजित सर्व रोगनिदान शिबिरात व्यक्त केला. तर मेळघाटच्या धर्तीवर धडगाव अक्कलकुवा भागात मदर ट्रॅकिंग चाइल्ड ट्रॅकिंग सुविधा सुरू करण्यात येतील, अशी घोषणा अारोग्य राज्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केली.

धडगाव येथे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण रुग्णालयात मोफत दंत सर्व रोगनिदान शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा सेनाध्यक्ष आदित्य ठाकरे तर उद‌्घाटक राज्याचे सार्वजनिक आराेग्य मंत्री डॉ. दीपक सावंत होते. खासदार डॉ. हीना गावित, आमदार विजयकुमार गावित तसेच अधिकारी उपस्थित होते. या वेळी ते बोलत होते.
ठाकरे म्हणाले, इथे मोबाइलचे नेटवर्क नाही. तेव्हा या भागात करण्यासारखे खूपच आहे. मुंबईत आम्ही बाइक अॅम्ब्युलन्स सुरू करण्यासंदर्भात चर्चा करायचो. त्यातच बोट अॅम्ब्युलन्सची कल्पना सुचली. या योजनेसाठी नंदुरबारची निवड केली. आज त्यासाठीच नंदुरबारला आलो. अभिमान वाटतो आज एक बार्ज दिली आहे. येणाऱ्या काळात त्या अजून दोन वाढणार म्हणजे जिथे मोबाइल नेटवर्क नाही पोहाेचले तिथे आपल्या बार्ज पोहोचल्या. खासदार डॉ. हीना गावितांनी केलेल्या आदिवासी भाषेतील भाषणाचा वापर प्रबोधनासाठी महाराष्ट्रभर करावा. लोकप्रतिनिधींनी स्थानिक भाषेत प्रबोधन करणे महत्त्वाचे आहे. ही बाब खरोखर अभिमानास्पद आहे. मी पहिल्यांदा भुशात आलो असलो तरी पहिल्यांदा येणे म्हणजे शेवटचे येणे नव्हे. मी पुन्हा पुन्हा येथे येत जाईन आणि काय कामे आहेत ती करीत जाईन. इथल्या रस्त्यांबाबत गेल्याबरोबर लगेच मुख्यमंत्र्यांशी बोलू. कुठे हंॅडपंप, कुठे सोलर पाॅवरची गरज आहे हे विषय मी आजपासून हातात घेतले. मला फक्त तुमची साथ पाहिजे. सोबत पाहिजे.
जुन्या बार्ज भंगारात देता शाळा म्हणून वापराव्यात तसेच तात्पुरत्या हॉस्पिटलसाठी बनवून गावागावात फिरवाव्या. त्याचा वापर तंबूसारखाही होईल. डॉक्टरांच्या समस्या पण जाणून घेतल्या पाहिजे. आपण जीव वाचवण्यासाठी दोन लाेकांना साकडे घालतो. त्यात पाहिला म्हणजे देव दुसरा डॉक्टर. म्हणून डॉक्टरांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे. सरकार आपले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील नर्मदा काठावरील प्रकल्पबाधित गावांना आरोग्य सेवा पुरवण्याकामी दाेन तरंगत्या दवाखान्यांसोबत एक तरंगत्या रुग्णवाहिकेचा लाकार्पण सोहळा या वेळी झाला. मान्यवर उपस्थित होते.

हे होते उपस्थित
जिल्हाधिकारीप्रदीप पी, मुख्य कार्यकारी अधिकारी राधाकृष्ण गमे, संचालक सतीश पवार, डेप्युटी संचालक अर्चना पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ पाटील, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. नागरगोजे, तालुका अारोेग्याधिकारी डॉ. दासरवार, डॉ. अशोक गिप्टे आदी उपस्थित होते.

हेल्थ कार्ड तयार करणार
जिल्ह्यात सिकलसेलचे रुग्ण अधिक आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात सिकलसेलचे संशोधन केंद्र व्हावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सिकलसेलसाठी स्वतंत्र रुग्णालय व्हावे, अशी मागणी आरोग्य मंत्र्यांंकडे आपण केली आहे. प्रत्येकाचे हेल्थ कार्ड बनवून आरोग्याची काळजी घेतली जाईल. चार वर्षात एकही कुपोषित बालक राहणार नाही, यासाठी कुपोषणमुक्त जिल्हा करण्याचा मी संकल्प केला आहे. डॉ.हीना गावित, खासदार,नंदुरबार

कुपोषणाचा प्रश्न सोडवणार
कुपोषणाचा प्रश्न आम्ही मान्य करतो. कुपोषणमुक्त जिल्हा केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आदिवासी महिलांच्या गरोदरपणात पहिल्या महिन्यापासून काळजी घेण्यात येईल. मेळघाटच्या धर्तीवर मदर ट्रॅकिंग चाइल्ड ट्रॅकिंगच्या सुविधा पुरवण्यात येतील. गर्भवती महिलांच्या रक्तगटाची तपासणीपासून त्यांच्या बारीकसारीक नोंदी घेतल्या जातील. त्याप्रमाणे त्यांच्यावर उपचार केले जातील. यातून कुपोषणाचा प्रश्न सुटू शकेल. डॉ.दीपक सावंत, आरोग्य राज्यमंत्री

या घोषणा
>रेकॉर्ड ब्रेक भरती करणार.
>आरोग्य खात्यातील एकूण रिक्त पदांपैकी ७५ टक्के पदे भरणार.
>राज्यात विशेष दोन हजार ३०९ पदांची भरती करणार.
>गटात दहा हजार ३०० पदांची रेकॉर्ड ब्रेक भरती हाेणार.
बार्ज अर्थात तरंगत्या दवाखान्याचे उद‌्घाटन करताना आदित्य ठाकरे अादी.