आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Without Number Plate Vehicle On Police Action In Bhusawal

भुसावळ पोलिसांच्या रडारवर विनाक्रमांकाची वाहने; कारवाई सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- रात्री-अपरात्री घराकडे जाणार्‍या पादचार्‍यांना अडवून पैसे हिसकावून घेण्याचे प्रकार शहरात नवीन नाही. या पाठोपाठ आता धूम स्टाइल चोरट्यांनी पुन्हा उच्छाद मांडला आहे.

चोरटे खासकरून विनाक्रमांकाच्या वाहनांचा उपयोग करत असल्याने आरोपींपर्यंत पोहोचणे कठीण होते. या मुळे भुसावळ पोलिसांनी आता शहरातील विनाक्रमांकाची वाहने रडारवर घेतली आहेत. बुधवारी विनाक्रमांकाच्या दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी धूम स्टाइलने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. यापूर्वी गेल्या महिन्यात झालेल्या घरफोड्या, महिलेवरील बलात्कारामुळे समाजमन अस्वस्थ आहे.

त्यातच पुन्हा ऐन सणावाराच्या कालावधीत चोरट्यांनी शहरात पुन्हा डोके वर काढल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या मुळे पोलिसांवर दबाव वाढला असून वारंवार चोरीच्या गुन्ह्यात समोर येणार्‍यांच्या मुसक्या आवळण्यासाठी लवकरच ठोस कारवाई शक्य आहे. या कारवाईच्या पहिल्या टप्प्यात विनाक्रमांकाने शहरात फिरणार्‍या दुचाकी पोलिसांच्या रडारवर आहेत. केवळ दुचाकीच नव्हे तर महिनोंमहिने विनाक्रमांकाने फिरणार्‍या चारचाकींची चौकशी होणार आहे. विनाक्रमांकाच्या वाहनांचा चोरी विशेषत: सोनसाखळी हिसकावण्याच्या घटनांमध्ये वापर होत असल्याचे पुढे आल्याने पोलिसांनी ही दक्षता घेतली आहे. दरम्यान, बुधवारच्या घटनेनंतर पोलिसांनी विनाक्रमांकाची ‘आपाची’ कंपनीची दुचाकी संशयावरून ताब्यात घेतली आहे. भर दिवसा झालेल्या धूम स्टाइल चोरीतील मुख्य आरोपी मात्र अजूनही फरारच आहेत.

दिवसाढवळ्या सोनसाखळी लांबवल्याने दक्षता
कारवाई होणारच
वाहतूक शाखेला वाहनांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विनाक्रमांकाच्या वाहनांवर कारवाई होणार आहे. कोणाचीही गय होणार नाही.
-विवेक पानसरे, पोलिस उपअधीक्षक, भुसावळ

शहरात येथे होतो त्रास
शहरातील जामनेर रोड, नाहाटा महाविद्यालय, गांधी पुतळा, रेल्वे आणि बसस्थानक परिसरात विनाक्रमांकाच्या दुचाकींवरून काही टारगट युवक घिरट्या घालताना दिसतात. या मुळे रस्त्याने येणार्‍या-जाणार्‍या विद्यार्थिनी, महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.

आरोपीचे नाव कळाले
शहरात बुधवारी ‘धूम स्टाइल’ने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवणार्‍या चोरट्याचे नाव पोलिसांना समजले आहे. पोलिस त्यांच्या लवकरच मुसक्या आवळतील, अशी चिन्हे आहेत. केवळ आरोपीच नव्हे तर त्याला मदत करणार्‍यांवर सुद्धा फौजदारी कारवाई होणार आहे.