आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Dies After Being \'pushed\' Off Train At Jalgoan

महिला मृत्यू प्रकरण: टीसीचा दोष नसल्याचा रेल्वे प्रशासनाचा दावा, 21 सेकंदांत संपले आयुष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - धावती रेल्वे पकडण्याच्या नादात जनता एक्स्प्रेसखाली येऊन महिला प्रवासी उज्ज्वला पंड्या यांचा गुरुवारी जळगावच्या स्थानकावर अवघ्या 21 सेकंदांत मृत्यू झाला होता. ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे सांगून यात रेल्वेच्या तिकीट तपासणीसाचा दोष नसल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून हे स्पष्ट होते, असा दावा रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक एन. जी. बोरीकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.
गुरुवारी सकाळी 5.58 वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर जनता एक्स्प्रेसमध्ये चढणार्‍या पंड्या यांचा चाकाखाली येऊन मृत्यू झाला. या घटनेला मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे गाडीतील टीसी संपत साळुंखे जबाबदार आहेत. गाडीत चढताना त्यांनीच पंड्या यांना ढकलले, असा आरोप पंड्या यांच्या नातेवाईकांनी केला होता. त्यावरून पंड्या यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी साळुंखे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या घटनेनंतर शुक्रवारी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने अधिकृत भूमिका माध्यमांसमोर मांडली.

वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक
जळगाव रेल्वेस्थानकावरील या दुर्घटनाप्रकरणी शुक्रवारी सकाळी 10 वाजता रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी डीआरएम महेशकुमार गुप्ता, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक एन.जी.बोरीकर, रेल्वे हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.हर्षवर्धन, रेल्वे सुरक्षा बलाचे सहायक आयुक्त पी.एल.वर्मा यांची बैठक झाली. या बैठकीत उपस्थित अधिकार्‍यांकडून दुर्घटनेचे सीसीटीव्ही फुटेज बारकाईने पाहण्यात आले.
मारहाणीचे नव्हे महिला दगावल्याचे दु:ख : साळुंखे
महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले तिकीट तपासणीस संपत साळुंखे यांना शुक्रवारी दुपारी भुसावळ न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. ‘रेल्वे स्थानकावर मला झालेल्या मारहाणीचे दु:ख नाही. मात्र, प्रवासी महिला दगावल्याबद्दल वाईट वाटते. मी त्यांना ढकलले नाही, उलट गाडीमध्ये चढण्यासाठी मदतीचा हात दिला होता’, असे टीसी संपत साळुंखे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
‘टीसी’ने मदतच केली
वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक एन.जी.बोरीकर यांनी पंड्या यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज दाखवले. फुटेजमध्ये टीसी साळुंखे महिलेला कुठेही ढकलताना दिसत नाहीत, उलट त्यांनी पंड्या यांना गाडीत चढण्यासाठी मदतीचा प्रयत्न केला होता, असे सांगितले.

अन् जीवनयात्रा संपली
जळगाव रेल्वे स्थानकावर गाडी सुरू झाली तेव्हा 5 वाजून 58 मिनिटे आणि 32 सेकंद झाले होते. उज्‍जवला पंड्या यांनी मुलांना गाडीत बसवत स्वत: चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यशस्वी न झाल्याने त्या थेट गाडीच्या चाकाखाली सापडल्या. अवघ्या 21 सेकंदांत म्हणजेच 5 वाजून 58 मिनिटे आणि 51 सेकंदाला त्यांची जीवनयात्रा संपली.

जळगाव रेल्वेस्थानकावर रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करत असलेल्या महिला प्रवाशाचा प्लॅटफॉर्मवर घसरून मृत्यू झाला. स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजवरून तयार केलेली रेखाचित्रे पुढील स्लाइडमध्ये...