आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Health News In Marathi, Railway Hostpital, Divya Marathi

सूचनेनंतर गरोदर महिलेवर उपचार करण्यास नकार देणा-या डॉक्टरस राजी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - गरोदर महिलेवर उपचार करण्यास नकार देणा-या रेल्वे हॉस्पिटलमधील डॉक्टरांविरुद्ध एनआरएमयू पदाधिका-यांनी शनिवारी मध्यरात्री घोषणाबाजी केली. अखेर डीआरएम महेशकुमार गुप्ता यांनी संबंधितांना सूचना दिल्यानंतर महिलेवर उपचार करण्यात आले. रविवारी या संबंधित महिलेस पुत्ररत्न प्राप्त झाला.

रेल्वेचे ट्रॅकमन लेखराजसिंग प्रकाशसिंग यांच्या पत्नी जागृती यांच्यावर रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मुंबई येथील तज्ज्ञ महिला डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत होत्या. मात्र, मध्यंतरीच्या काळात जागृती या माहेरी गेल्याने त्यांना रुग्णालयात येता आले नाही. त्यामुळे त्यांच्या गरोदरपणातील उपचारात खंड पडला. शनिवारी रात्री त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना रेल्वे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, हॉस्पिटलमधील डॉ. एस. एम. आठवले यांनी त्यांच्यावर उपचार करण्यास नकार दिला. यापूर्वी झालेल्या उपचारांची माहिती नसल्याचे कारण डॉ. आठवले यांनी पुढे केले.

मध्यरात्री घडला प्रकार
माहिती मिळताच एनआरएमयूचे पदाधिकारी रेल्वे हॉस्पिटलमध्ये शनिवारी मध्यरात्री एकत्र आले. उपचार न करणारे डॉक्टर व प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी केली. इब्राहिम खान यांनी डीआरएम गुप्ता यांच्यासोबत चर्चा के ली. त्यानंतर महिलेवर उपचार करण्यात आले, अशी माहिती एनआरएमयूचे रनिंग शाखेचे पदाधिकारी अरुण धांडे यांनी दिली.

रुग्णांमध्ये तीव्र संताप
रेल्वे रुग्णालयात रुग्णांना पुरेशा सुविधा मिळत नसल्याने गेल्या सहा महिन्यांपासून तक्रारी वाढल्या आहेत. मध्यंतरी दोन ते तीन वेळा रुग्णालयातील डॉक्टर व रुग्णांमध्ये हुज्जत झाल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र, त्याची जाहीर वाच्यता झालेली नाही.

रुग्णांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष
रेल्वे हॉस्पिटलबाबत रुग्णांच्या अनेक तक्रारी आहेत. वैद्यकीय अधिका-यांची संख्या कमी असल्याने उपचारात अडचणी येतात. रुग्णांना पुरेशी औषधी पुरवली जात नाही. या प्रकरणी रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे तक्रार करण्याचा इशारा एनआरएमयू पदाधिका-यांनी दिला आहे.

रात्रीच योग्य उपचार केले
रुग्णासह उपचार करणा-या डॉक्टरांचीही भूमिका योग्य आहे. रुग्णावर नेमके कोणते उपचार सुरू आहेत, याची माहिती वैद्यकीय अधिका-यांना असणे गरजेचे आहे. रुग्णांची परिस्थिती पाहून डॉक्टर उपचार करतात. रात्रीच या महिलेवर योग्य उपचार करण्यात आले आहेत.
महेशकुमार गुप्ता, विभागीय रेल्वे व्यवस्थापक

प्रशासनाची मुजोरी वाढली
रेल्वे हॉस्पिटलमध्ये सध्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून मुजोरी वाढली आहे. रेल्वे प्रशासनाने समस्या सोडवणे गरजेचे आहे. अन्यथा, कर्मचा-यांच्या भावना तीव्र आहेत.
इब्राहिम खान, मंडळ सचिव, एनआरएमयू, भुसावळ