आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांनी जाणले गर्भसंस्कार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- अत्याधुनिक तंत्रज्ञानाने वैद्यकीय क्षेत्रात अनेक बदल होत आहेत. कुटुंब नियोजनाच्या अनेक पद्धती उपलब्ध आहेत. यामुळे 21 व्या शतकात गर्भसंस्काराची व्याख्याच पूर्णपणे बदलली आहे. अशी स्थिती असली तरी गर्भधारणेनंतर स्त्रीने आपल्या बाळाच्या योग्य संगोपनासाठी व सुदृढ बाळाच्या जन्मासाठी प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न व घेतलेली काळजी हाच एक उत्तम गर्भसंस्कार असल्याचे प्रतिपादन स्त्रीरोग तज्ज्ञांनी केले. गर्भसंस्कारासाठी आवश्यक असणार्‍या महत्त्वपूर्ण टीप्सही त्यांनी दिल्या. रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्ड सिटी व भवरलाल अँण्ड कांताबाई जैन मल्टीपर्पज फाउंडेशनतर्फे नटराज थिएटरमध्ये ‘गर्भसंस्कार 21व्या शतकाचे’ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

दीपाली लोढा यांनी ‘गर्भवती महिलेचा आहार’ या विषयी माहिती दिली. मांसाहार टाळून शुद्ध योग्य शाकाहारी पदार्थांची निवड, सकाळची योगासने, योगा व ते करण्याची पद्धत प्रमाण या विषयी त्यांनी विविध स्लाइड शोच्या माध्यमातून माहिती दिली. गोल्डसिटीचे चेअरमन डॉ.मूलचंद उदासी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. व्यासपीठावर उद्योगपती रतनलाल सी.बाफना, ज्योती जैन, बाबा सुखरामदास, डॉ. प्रभू व्यास उपस्थित होते. मीनल जैन, प्रकाश पटेल, अंकुश अग्रवाल यांनी उपस्थितांचे स्वागत केले हेमांगी रंगलानी यांनी परिचय करून दिला.

योग्य मार्गदर्शनाचा अभाव
स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मनीषा दमाणी यांनी मातृत्वाची पूर्वतयारी या विषयी माहिती दिली. गर्भधारणेवेळी उत्तम संस्कार होणे आवश्यक आहे. वयाच्या 35 वर्षांपर्यंत मातृत्व मिळविणे फायदेशीर आहे. प्रसूतीनंतरही मुलांना दोन वर्षांपर्यत आई-वडिलांचा सहवास द्यावा. धूम्रपान, अल्कोहोल, मानसिक ताणतणाव यापासून दूर राहून योगा, मेडिटेशन, प्राणायामाने मातृत्वाचा सुखद अनुभव घेण्याच्या टीप्सही त्यांनी दिल्या.

मेंदूची वाढ निकोप व्हावी
गर्भसंस्कार -बालसंस्कार याविषयावर 20 वर्षांपासूनचे गाढे अभ्यासक जेम्स निकोलस म्हणाले की, केवळ नऊ महिन्यांचा विचार करून आपण गर्भसंस्कार साधल्याचा आव सुशिक्षित जोडपे आणतात. गर्भसंस्काराला छोटे न बनविता, त्यातील खरे विचार समजून घेणे गरजेचे आहे. मातेच्या तणावातून बाळावर तणावाचे संस्कार होतात. बाळाच्या मेंदूची वाढ निकोप झाली पाहिजे, यासाठी योग्य विचार- आचार असणे आवश्यक आहे. स्वभावाचे अवलोकन करण्याचीही गरज आहे.