आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगावात लोकशाहीच्या निम्म्या ताकदीला हादरा; महिला मतदारांत घट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- गेल्या पाव शतकात जिल्ह्यातील महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या तुलनेत मोठय़ा प्रमाणात घटली आहे. स्त्रीभ्रूणहत्येचाच तो गंभीर परिणाम असल्याचे वेगळे सांगायची गरजच राहिलेली नाही. परिणामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्के आरक्षण मिळविणार्‍या महिला मतदारांची संख्या जिल्ह्यात पुरुषांच्या तुलनेत 47 टक्क्यापर्यंत खाली आली आहे. जळगाव शहरात होणार्‍या महापालिका निवडणुकीसाठी केवळ 46.31 टक्केच महिला मतदार आहेत.

जळगाव शहरात पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची ताकद चार टक्क्यांनी घसरली आहे. जिल्ह्यातील इतर सात विधानसभा मतदारसंघात सन 1980 मध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या 13 हजार 500 ने अधिक होती. तीच संख्या आता दीड लाखाने कमी झाली आहे. 1990 ते 1995 या पाच वर्षात जन्मलेली अपत्ये आता मतदार झाले आहेत. त्याच काळात स्त्रीभ्रूणहत्येचे लोण वाढायला लागले होते. स्वाभाविकच, त्या काळात गर्भावस्थेतच हत्या करण्यात आलेल्या मुलींची उणीव मतदारांच्या आकडेवारीत सहज दिसू लागली आहे. मतदार यादीत युवक मतदारांची संख्या वाढल्याने 50 टक्के गृहीत धरलेल्या महिला प्रत्यक्षात तीन टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.

अशा पद्धतीने वाढत गेली तफावत
समाजात पुरुषांच्या बरोबरीने महिलांना अधिकार, हक्क देण्यासाठी प्रयत्न होत आहेत. विविध क्षेत्रासह राजकारणातही निम्मे ताकद म्हणून महिलांचा सन्मान केला जात आहे. राजकीय व्यासपीठावर महिलांना सरसकट 50 टक्के म्हणून गौरव होऊ लागला आहे. प्रत्यक्षात ही ताकद 50 टक्के राहिलेली नसल्याचे वास्तव जळगाव जिल्ह्यात आहे. महिला मतदारांची ताकद स्त्रीभ्रूणहत्येच्या ग्रहणामुळे घसरली आहे. जिल्ह्यात 1980 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्त्री-पुरुषांच्या तुलनात्मक संख्येत महिलांची संख्या केवळ 467 ने कमी होती. त्यावेळी सात मतदारसंघात स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत तीन हजारांपेक्षाही अधिक संख्येने पुढे होत्या. याच मतदारसंघात आता महिलांची संख्या उणे 13 हजाराच्या घरात गेली आहे. 1990 च्या दशकात मोठय़ा प्रमाणात झालेल्या स्त्रीभ्रूणहत्येचे परिणाम आता दिसून येत आहे. 2009 ते 2013 या चार वर्षात 33 हजार 95 मतांनी स्त्री- पुरुषांमधील तफावत वाढली आहे.

1990च्या दशकात सर्वाधिक भ्रूणहत्या
सन 1091 मध्ये 0 ते 6 वयोगटातील मुलींचे जिल्ह्यातील प्रमाण एक हजारी मुलांमागे 925 होते. सन 2001 मध्ये हेच प्रमाण 880 पर्यंत खाली होते. सन 2009 मध्ये 854 तर 2011 मध्ये सर्वात कमी 829 पर्यंत ते खाली आले. याचाच अर्थ 1990 च्या दशकातच सर्वाधिक भ्रूणहत्या झाल्या आहेत.

महिला मतदार 46 टक्केच
महापालिकेच्या निवडणुकीत प्रथमच 50 टक्के जागांवर महिला प्रतिनिधित्व करतील. 50 टक्के आरक्षण असले तरी प्रत्यक्षात जळगाव शहरात महिला मतदार केवळ 46.31 टक्केच आहेत. मागील निवडणुकीत पुरुष आणि महिला मतदारांमध्ये 18 हजार 14 मतदारांची तफावत होती. या निवडणुकीत ही तफावत 26 हजार 356 मतदारांपर्यत गेली आहे. महापालिकेसाठी 1 लाख 91 हजार 846 प्रुुष, तर 1 लाख 65 हजार 490 महिला मतदार आहेत.