चाळीसगाव/ जळगाव- अवघ्या १५ दिवसांपूर्वी बाळंत झालेल्या महिलेचा अघोरी उपचार पद्धतीमुळे येथील बामोशीबाबा दर्ग्यावर मृत्यू झाला. मृत महिलेच्या सख्या बहिणीलाही उपचारासाठी दर्ग्यावर ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
वैशाली खैरनार (वय २४) ही महिला प्रसूतीसाठी खेडी (ता. जळगाव) येथे माहेरी आली होती. तिने मुलीला जन्म दिला. मात्र त्यानंतर तिच्या वागण्यात बदल झाला होता. रात्रभर मोठ्याने ओरडणे, असंबद्ध वागणे, कुणाचेही नाव घेणे, अशा प्रकारे ती वर्तवणूक करीत होती.
उपचारानंतरही तिच्या वागणुकीत बदल झाला नाही. त्यामुळे तिला भूतबाधा झाल्याचा ग्रह माहेरच्या लोकांनी करून घेतला. त्यामुळे तिला येथे दर्ग्यावर आणले. ती दोन दिवसांपासून तापाने फणफणत होती.त्यातच शुक्रवारी सकाळी तिचा अचानक मृत्यू झाला. तिच्या बहिणीलाही अशाच पद्धतीचा त्रास जाणवू लागल्याने तिलाही उपचारासाठी सोबत आणले होते, असे वैशालीचे वडील भगवान भालेराव यांनी सांगितले. मृत्यू झाल्यावरही वैशालीचा मृतदेह पाच तास दर्ग्यात पडून होता. तिचा पती दोन दिवसांपूर्वीच तिला येथे येऊन भेटून गेला होता. त्यांना बरे वाटल्यावर आता घरी हेडावे (ता. अमळनेर) येथेच घेऊन जाईल, अशी चर्चा त्याने सासू व सासऱ्यांशी केली होती. परंतु, त्याची पत्नीशी ही शेवटची भेट ठरली.
भूतबाधा झाल्याचा गैरसमज
वैशाली खैरनार व प्रीती गाढे या दोन्ही बहिणींना भूतबाधा झाल्याच्या संशयावरून कुटुंबीयांनी खेडी येथील घरासमोर १३ ऑक्टोबर रोजी साखळदंडाने रात्रभर थंडीत खाटेला बांधून ठेवले होते. भालेराव कुटुंबीय व त्यांच्या दोन्ही मुलींना भूतबाधा झाल्याची चर्चा खेडी ग्रामस्थांमध्ये होती.