आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोकादायक साइडपट्टीने घेतला महिलेचा बळी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- भराव नसलेल्या धोकादायक साइडपट्टीवरून दुचाकीचे चाक घसरल्यामुळे झालेल्या अपघातात एका 45 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना शनिवारी शहरातील इच्छादेवी चौफुलीजवळील सदोबा वेअर हाउससमोर महामार्गावर सकाळी 10.50 वाजता घडली.

भुसावळ तालुक्यातील मोंढाळा येथील रहिवासी असलेल्या ललिताबाई सुनील शिरसाठ असे मयत महिलेचे नाव आहे. ललिताबाई या त्यांचा मुलगा विशालसोबत दुचाकीने एरंडोल येथे नातेवाइकांकडे लग्नासाठी जात होत्या. यादरम्यान साइडपट्टीवरून दुचाकीचे चाक घसरल्यामुळे मागे बसलेल्या ललिताबाई यांचा तोल गेला व त्या रस्त्यावर कोसळल्या. याचवेळी पाठीमागून येणार्‍या डंपरच्या (क्र.एमएच-19/झेड-9778) मागील चाकाखाली त्यांचे डोके आले व क्षणातच त्या गतप्राण झाल्या. दुचाकी चालवत असलेल्या विशालला सात-आठ फूट पुढे गेल्यानंतर आई गाडीवरून पडल्याचे लक्षात आले. त्याने मागे पाहिले तोपर्यंत ललिताबाईचा मृत्यू झाला होता. शोकविव्हळ झालेल्या विशालने आक्रोश करीत आईचा मृतदेह सामान्य रुग्णालयात आणला, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्याचा आक्रोश बघून उपस्थितांनाही गलबलून आले. ललिताबाई यांचे पती मोंढाळा येथे सुतारकाम करतात, तर विशाल आणि त्याचा लहान भाऊ हातमजुरी करतात. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साइडपट्टी ठरली कारण
सदोबा वेअर हाउससमोरून जात असताना वर्दळीमुळे विशालने दुचाकी रस्त्याच्या कडेला घेतली. या ठिकाणी रस्त्यालगत समांतर साइडपट्टी नसल्यामुळे सहा ते आठ इंचांची खोलगट जागा होती. त्यावरून दुचाकीची दोन्ही चाके घसरली. त्यामुळे मागे बसलेल्या ललिताबाई उजव्या बाजूला थेट रस्त्यावर पडल्या. त्याचवेळी मागून येत असलेल्या डंपरच्या मागील चाकाखाली त्यांचे डोके आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या ठिकाणी पूर्वी गतिरोधक नसल्यामुळे अपघात होत होते, तर आता साइडपट्टय़ा नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ललिताबाई यांच्या मृत्यूलाही साइडपट्टीच जबाबदार ठरली आहे.

विशालचा दोन तास आक्रोश!
दुपारी 11.10 वाजता अँम्ब्युलन्सचालक सचिन राजपूत यांच्या मदतीने विशालने आईचा मृतदेह सामान्य रुग्णालयात आणला. या वेळी भांबावलेल्या अवस्थेत असलेल्या विशालला काहीही कळत नव्हते. आईचा मृतदेह पाहून तो ओक्साबोक्सी रडत होता. राजपूत यांनी विशालची समजूत काढत त्याच्या नातेवाइकांना फोन केले. विशाल दोन तासांपर्यंत शवविच्छेदनगृहाबाहेर आक्रोश करीत होता. ते पाहून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका मुस्लिम कुटुंबातील महिलेलाही रडू कोसळले. त्यांनी विशालला धीर देत पाणी पाजले. त्यानंतर विशालचे कुर्‍हे पानाचे व मोंढाळा येथील काही नातेवाइक आले.

दुचाकीवर ‘आई’चेच नाव
विशालने दुचाकी नुकतीच घेतली होती. तसेच दुचाकीला अद्याप क्रमांकही मिळालेला नव्हता. या नव्या दुचाकीवर ‘आई’ असे रेडियमने लिहिलेले होते. सकाळी 9.15 वाजता मोंढाळा येथून विशाल आणि त्याची आई दुचाकीने एरंडोल येथे नातेवाइकांकडे लग्नासाठी निघाले होते; मात्र 10.50 वाजता जळगाव शहरात रस्त्यातच अपघात होऊन त्यात विशालच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाला.