आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांनीच दिला कविताला खांदा, अमळनेरमधील महिलेच्या आत्महत्येप्रकरणी संताप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - अमळनेर येथील माहेर असलेल्या कविताच्या पार्थिवाला सोमवारी महिलांनीच जवळपास तीन किलोमीटरपर्यंत खांदा दिला. सावित्रीबाई फुले यांच्या पुतळयासमोरून जाणा-या या अंत्ययात्रेत प्रशासनाचा निषेध आणि दोषींवरील कारवाईसाठी घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, इनकॅमेरा शवविच्छेदनासाठी तिचे नातेवाईक आग्रही होते.
महिंदळे येथील कविता वाल्मीक पाटील (२१) या विवाहितेचा मृतदेह रविवारी सकाळी गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला होता.
तिच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त होत आहे.रविवारी पोलिसांच्या चालढकल धोरणामुळे तिचे शवविच्छेदन होऊ शकले नाही. सोमवारी सकाळी धुळयातील काही सामाजिक कार्य करणा-या महिलांनी जिल्हा रुग्णालय गाठून तिच्या नातलगांशी संवाद साधला. तसेच कविताच्या मृतदेहाचे इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात यावे, अशी मागणीही केली. धुळयातील महिला शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले. त्यानंतर शवविच्छेदनगृहापासून निघालेल्या कविताच्या अंत्ययात्रेला याच महिलांनी खांदा दिला. रुग्णालयापासून निघालेली ही अंत्ययात्रा सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील देवपूर स्मशानभूमीत आली. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना शासन करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

आत्महत्या व्हॉट्सअ‍ॅपवर?
गळफास घेतलेल्या अवस्थेत कविताचा मृतदेह दोरखंडावर असताना त्याचे फोटो आणि चित्रण करून तिच्या माहेरच्या नातलगांना ते पाठविण्यात आले, असा आरोप होत आहे. तथापि पोलिसांनी मात्र, याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

सासू आजारी, तिघांना कोठडी
कविताच्या मृत्यूनंतर अटक करण्यात आलेले तिचा पती वाल्मीक, दीर भालचंद्र व सासरे ईश्वर पाटील यांना धुळे न्यायालयाने गुरुवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तर तिची सासू सुनंदा पाटील यांची घटनेनंतर प्रकृती बिघडल्यामुळे अजूनही रुग्णालयात आहे.