आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉर्डबॉयला अटक न केल्यास आंदोलन; शिवसेनेचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सिव्हिलमध्ये गर्भपिशवीच्या शस्त्रक्रियेसाठी बोदवडची महिला दाखल होती. सिव्हिलच्या वॉर्डबॉयने रविवारी या महिलेला डॉक्टरांनी बोलावल्याचे सांगत तिला निर्जनस्थळी घेऊन आला. ही बाब या महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने त्याच्या हाताला झटका देत या नराधमाच्या कचाट्यातून आपली सुटका करून घेतली होती. या पीडित महिलेची सोमवारी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत चौकशी केली; वॉर्डबॉय गोकूळ प्रकाश चौधरी याला तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

बोदवडच्या एका विवाहितेवर गर्भपिशवीला असलेल्या गाठीच्या शस्त्रक्रियेसाठी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी सायंकाळी ५.४५ वाजता मद्यधुंद अवस्थेत असलेला वॉर्डबॉय गोकूळ चौधरी हा तिला भेटला. त्याने त्या महिलेला डॉक्टरांनी तुम्हाला बोलावल्याचे सांगितले. त्यानंतर तिला वॉर्ड क्रमांक १२ मधून खाली उतरवून जुन्या वॉर्ड क्रमांक ६कडे निर्जन ठिकाणी घेऊन जात होता. हे त्या महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने हाताला झटका देऊन पळ काढला. या प्रकरणी तिने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून वनियभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, अजूनही वॉर्डबॉय फरार आहे. दरम्यान, सोमवारी पीडित महिलेची शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विचारपूस केली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक किरण पाटील यांच्याशी चर्चा केली. दरम्यान दोषी गोकूळ चौधरीला अटक करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

सिव्हिल सुरक्षित नाही
जिल्हासामान्य रुग्णालयात महिलांची नेहमीच छेडछाड होत असते. त्यातील काही महिला पुढे येतात. मात्र, काही महिला बदनामी होईल या भीतीने पुढे येत नाहीत. त्यामुळे सिव्हिल महिलांसाठी असुरक्षित आहे. रविवारी ज्या नराधमाने हा प्रकार केला, त्याला तत्काळ अटक केली नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू.
- शोभा चौधरी, शिवसेना महिला आघाडी
गोकुळ चौधरीला अटक
स्थानिकगुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी संशयित गोकुळ चौधरी याला सावदा येथून अटक केली. रविवारी गुन्हा दाखल झाल्यानंतर तो रात्रीच सावदा येथे पळून गेला होता. एलसीबीच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्याला दुपारी सावद्यातून ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासासाठी त्याला जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक किरण पाटील यांच्याशी चर्चा करताना शिवसेना महिला आघाडीच्या शोभा चौधरी, मनीषा पाटील, सुचित्रा महाजन, ज्योती शिवदे, पद्मा चोरडिया.