जळगाव- मनपाने शहरातील महत्त्वाच्या मार्गावर तसेच गर्दीच्या ठिकाणी महिला प्रसाधनगृहांची व्यवस्था करण्याची तयारी सुरू केली आहे. त्या दृष्टीने पहिल्या टप्प्यात १० ठिकाणे निश्चित केली आहे. याबाबतचा प्रस्ताव उपायुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. एकीकडे कामाला गती येत असताना मात्र, उपायुक्तांकडे पाठवलेली फाइलच गायब झाल्याची बाब उघडकीस आली आहे.
राज्यभरात महिलांच्या प्रसाधनगृहांविषयी महापालिका दुर्लक्ष करीत असल्याची बाब उघडकीस आली होती. घरातून बाहेर पडणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाच्या रस्त्यावर तसेच गर्दीच्या ठिकाणी काेणतीही व्यवस्था नसल्याने उच्च न्यायालयाने हा विषय गंभीरतेने घेतला. याबाबतचा आराखडा १९ जूनपर्यंत सादर करण्याचे आदेश सर्वच महापालिकांना दिले आहेत. जळगाव महापालिकेने यासंदर्भातील काेणताही आराखडा तयार केला नसल्याची बाब माहितीच्या अधिकारात उघडकीस आली होती.
मनसेच्या महिला महानगराध्यक्षा वैशाली विसपुते यांनी तर कायदेशीर नाेटीस देण्याची तयारी सुरू केली आहे. महापालिकेची उदासीनता ‘दिव्य मराठी’ने उघडकीस आणल्यानंतर बांधकाम विभागाने तातडीने याबाबत प्रक्रियेला गती िदली आहे. महिलांसाठीचे फायबरचे प्रसाधनगृह बसवण्यात येणार आहे. त्याचा प्रस्तावदेखील तयार करून ताे उपायुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.
वर्क ऑर्डर देणार : उपायुक्तांकडूनप्रसाधनगृहांच्या दरपत्रकांचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर मक्तेदाराला त्या कामासाठीची वर्कऑर्डर देण्यात येणार असल्याचे शहर अभियंता सुनील भोळे यांनी सांगितले. यासाठी पहिल्या टप्प्यात १० ठिकाणं निश्चित केली आहेत. ठेकेदारानेही यासाठी तातडीने प्रसाधनगृह उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली आहे.
अशी आहेत ठिकाणे : गुजराल पेट्रोल पंपाजवळील समांतर रस्ता, सोमाणी मार्केटच्या दोन्ही बाजूंचे रस्ते, मल्टिपर्पज हाॅलजवळ, सुभाष चौक रस्त्यावर, घाणेकर चौक रस्त्यावर, चेतनदास मेहता हॉस्पिटलजवळ, आठवडे बाजाराच्या परिसरात, काव्य रत्नावली चौक, अजिंठा चौफुली, खोटेनगर आदी परिसरांचा समावेश आहे.
फाइलची शोधाशोध सुरू
न्यायालयाला आराखडा सादर करायचा असल्याने तातडीने प्रक्रिया राबवली जात आहे. आरोग्य विभागाकडून वस्तुनिष्ठ अहवाल शहर अभियंत्यांकडे आला. त्यांच्याकडूनही प्रस्ताव मंजुरीसाठी उपायुक्तांकडे रवाना झाला. मात्र, आता त्या प्रस्तावाची फाइलच गहाळ झाल्याची चर्चा पालिकेत रंगत आहे.